
मुंबई : कुडाळ येथील एसटी बस स्थानकाजवळील गुरुवार, २४ एप्रिल रोजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने आभार सभेचे आयोजन केले होते. या सभेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री निलेश राणे आदी उपस्थित होते.
या सभेत भाषणावेळी रात्री १०.०५ ते ११.३५ पर्यंत पूर्ण क्षमतेने ध्वनिक्षेपकाचा आवाज होता. मात्र रात्री १० नंतर ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये, उच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासला असून उपस्थितांसह आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे पत्र सिंधुदुर्ग ओरस जिल्हा पोलीस अधीक्षक यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी दिले आहे.
एकनाथ शिंदे तसेच व्यासपीठावरील उपस्थित प्रमुख नेतेमंडळी, मंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे व सदर सभेचे आयोजक यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी तत्काळ कारवाई करण्यात यावी, असे पत्र विनायक राऊत यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे.
नेमके काय घडले?
कुडाळ येथे एसटी बसस्थानक मैदानावर शिवसेना (शिंदे गट) या पक्षाच्या वतीने आभार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस महाराष्ट्र राज्याचे विद्यामान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे इत्यादी नेते मंडळी उपस्थित होती. शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या या जाहीर आभार सभेमध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री १०.०५ ते ११.३५ या वेळेत ध्वनिक्षेपकाचा पूर्णक्षमतेने वापर करून जाहीर भाषण केलेले आहे. त्या ठिकाणी पोलीस प्रशासनही बंदोबस्ताच्या निमित्ताने उपस्थित होता.
जाहीर सभा व ध्वनिक्षेपकाचा वापर रात्री १० वाजल्यानंतर करण्यात येऊ नये, असे न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार सभेमध्ये रात्री १०.०५ नंतर ११.३५ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाचा पूर्ण क्षमतेने वापर करून जाहीर भाषण केले. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून न्यायालयाचा अवमान केला आहे.