लोअर परळ पूल सोमवारपासून वाहतुकीसाठी खुला, पाच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मुंबईकरांच्या सेवेत

मुंबई महापालिकेचे पायाभूत सुविधा उपायुक्त उल्हास महाले यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
लोअर परळ पूल सोमवारपासून वाहतुकीसाठी खुला, पाच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मुंबईकरांच्या सेवेत

मुंबई : विविध कारणांमुळे रखडलेल्या लोअर परळला अखेर गणेशोत्सवाआधीचा मुहूर्त मिळाला आहे. लोअर परळ पूल पुढील सोमवारपासून म्हणजेच बाप्पाच्या आगमनाच्या एक दिवसआधीच वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईकरांच्या सेवेत लोअर परळचा पूल खुला होणार आहे. या पुलाची लोअर परळ ते वरळीच्या दिशेने जाणारी मार्गिका मे महिन्यांत वाहनांसाठी सुरू करण्यात आली आहे. तर आता दुसऱ्या बाजूची मार्गिका सुरू होणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे पायाभूत सुविधा उपायुक्त उल्हास महाले यांनी दिली.

लोअर परळ, वरळी, प्रभादेवी आणि करीरोड, भायखळा परिसरात वाहतुकीचा कणा असलेला लोअर परळ (डिलाईल रोड) पूल आहे. हा पूल धोकादायक झाल्यामुळे जुलै २०१८ ला बंद करण्यात आला. विविध समस्यांमुळे या पुलाचे काम रखडले आहे. लोअर परळ रेल्‍वे स्थानकाजवळ ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावर हा पूल बांधण्याचे काम सुरू आहे. रेल्वे आणि पालिका यांनी मिळून बांधलेला हा पूल असून रेल्वेच्या हद्दीतील ८५ मीटर लांबीचे बांधकाम करण्‍यासाठी मुंबई महानगरपालिकेने रेल्‍वेला निधी दिला आहे. या पुलावर ना. म. जोशी मार्गावरून येणारे २ आणि गणपतराव कदम मार्गावरुन येणारा १ असे तिन्ही मिळून एकूण ६०० मीटर लांबीचे तीन पोहोच रस्‍त्‍यांचे बांधकाम महानगरपालिकेकडून केले जात आहे. या कामासाठी पालिकेने सुमारे १३८ कोटींचे कंत्राट दिले आहे. या पुलाची पश्चिमेकडील मार्गिका गेल्या मे महिन्यापासून वाहनचालकांसाठी खुली झाली.

खडीच्या टंचाईमुळे कामावर परिणाम

मे महिन्यात पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली केल्यानंतर, त्याच दरम्यान बांधकामाच्या खडीच्या टंचाईमुळे पुलाच्या कामावर परिणाम झाला. जुलैमध्ये मुसळधार पाऊस असल्याने काम करण्यास अडथळे आल्याने या पुलाचा मुहूर्त चुकला.

गणपतीत गर्दी कमी होण्यास मदत

येत्या १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे गजबजलेल्या या मार्गावरील हा पूल गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यामुळे पालिकेने पुलाची ना. म. जोशी मार्गाच्या टोकाकडील एक मार्गिका खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मार्गिका खुली होणार असल्याने लालबाग, परळमध्ये गणपती उत्सवादरम्यान होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in