लम्पी आजाराचा मुंबईत शिरकाव; दोन जनावरांना बाधा

लम्पी आजाराची माणसांना किंवा इतर प्राण्यांना बाधा होत नसल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉ. पेठे यांनी सांगितले.
लम्पी आजाराचा मुंबईत शिरकाव; दोन जनावरांना बाधा
Published on

राज्याला लम्पी आजाराचा शिरकाव होऊनही मुंबईतील जनावरे या बाधेपासून दूर होती; मात्र आता अखेर मुंबईतील जनावरांच्या, पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या नमुन्यांपैकी २ नमुने पॉझिटिव्ह आल्याने आता अशा जनावरांची जास्त काळजी घ्यावी लागणार असल्याचे राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले; मात्र यात जमेची बाजू अशी की, लम्पी आजाराची माणसांना किंवा इतर प्राण्यांना बाधा होत नसल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉ. पेठे यांनी सांगितले.   

लम्पी आजाराचा धोका लक्षात घेउन पालिका आणि राज्य शासनाकडून गाय- बैलांवर लम्पीचा प्रादुर्भाव झाल्यापासून मुंबईत पालिकेकडून लसीकरणासाठी पुढाकार घेतला गेला. मुंबईत सुमारे २००० गायींचे लसीकरण करण्यात आले, तर जनावरांची तपासणी देखील सुरूकरण्यात आली. त्यात आजारी आणि संशयित गुरांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथीलप्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यातील दोन नमुने पॉझिटिव्ह असल्याचे डॉ. पेठे यांनी सांगितले. त्यामुळे बाधीत झालेल्या जनावरांवर विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे देखील डॉ. पेठे सांगितले.  पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे गोरेगाव येथे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसमधील ३  आणि इतर ठिकाणचे मिळून १७ गाईंचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यातील पॉझिटिव्ह असणाऱ्या गाईंचे अलगीकरण करून उपचार सुरू करण्यात आले आहेत. दोन्ही गाई उपचाराला प्रतिसाद देत असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉ.पेठे यांनी दिली. 

माणसांना धोका नाही

लम्पीचा आजार केवळ गोवंशीय म्हणजे गाय आणि बैल या जनावरांना होतो. या आजाराची लागण म्हैस, बकरी किंवा इतर प्राण्यांना होत नाही. माणसांना याचा कोणताही धोका नाही. ज्या आरे परिसरातील गाईंना लम्पीची बाधा झाली, त्या परिसराच्या ५ किलोमीटरपर्यंत असणाऱ्या जनावरांची तपासणी केल्याचे ही पेठे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in