मुंबईत लम्पी विषाणूचा फैलाव झपाट्याने वाढला

राज्यातील जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात ४ ऑगस्ट रोजी जनावराला लम्पीची लागण झाल्याचे निदान झाले
मुंबईत लम्पी विषाणूचा फैलाव झपाट्याने वाढला
Published on

राज्यात अनेक जिल्ह्यांत लम्पी विषाणूचा फैलाव झपाट्याने होत असताना मुंबईत लम्पीची लागण झाल्याची संशयित गाईचा नमुना पुण्याच्या रोग अन्वेषण विभागाकडे पाठवला असून अहवालाची प्रतीक्षा आहे. लम्पी विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने जनावरांच्या लसीकरणावर भर दिला आहे. मुंबईत आतापर्यंत १,९०८ गाईचे लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईत ३,२२६ गोजातीय, तर २४,३८८ म्हैस-वर्गीय जनावरे असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

राज्यातील जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात ४ ऑगस्ट रोजी जनावराला लम्पीची लागण झाल्याचे निदान झाले. त्यानंतर आतापर्यंत लम्पी विषाणुचा झपाट्याने प्रसार होत असून जनावरे दगावण्याची संख्या वाढत आहे. मुंबईत लम्पी विषाणुचा फैलाव होऊ नये यासाठी राज्य सरकार व मुंबई महापालिकेने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. तसेच मुंबईतील गो शाळा तबेले व जनावरांची तपासणी सुरु केली आहे. या तपासणीत लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून आतापर्यंत १,९०८ गाईंच लसीकरण करण्यात आल्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले.

२०१९ च्या पशुगणनेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार २२६ गोजातीय जनावरे व २४ हजार ३८८ म्हैस-वर्गीय जनावरे आहेत. गोजातीय प्रजातींची बाधित असलेली कोणतीही जीवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गोजातीय प्रजातींची कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवा-यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी, नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.

लम्पी विषाणुची लागण गोवंशायांना होते. मात्र मनुष्याला लम्पी विषाणुचा धोका नसून दूधापासून रोग पसरण्याची भीती नाही, असेही पेठे यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in