

मुंबई : महाराष्ट्रातील तमाशासह लोक कलेचा आधारवड आणि लोककलेत आपली भिष्मचार्य म्हणून प्रतिमा उमटवून असणारे मधुकर नेराळे यांचे मुंबईत सोमवारी हृदयविकाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले आहेत.
नेराळे यांनी आयुष्यभर लोक कलेच्या अस्तित्वासाठी स्वतःला वाहून घेतले. वडिलोपार्जित गिरणगावातील न्यू हनुमान थिएटरमध्ये १९६० पर्यंत पारंपरिक तमाशा कलेला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. रोशन सातारकर, यमुनाबाई वाईकर, लिला गांधी ते अगदी मधु कांबीरकर यांच्यापर्यंत असंख्य कलावंताना 'न्यू हनुमान थिएटर' हे आधारवड ठरले.
त्यांनी १९६९ च्या सुमारास स्वतःची यशराज लोक नाट्य संस्था स्थापन करून, वगसम्राट, गाढवाचे लग्न, आतून कीर्तन बाहेरून तमाशा, राजकारण गेले चूलीत, उदं गं आंबे उदं, पुनवेची रात्र काजळी अशी एका पेक्षा एक संगीत लोकनाट्य कला रसिकांपुढे आणून कलावंतांमध्ये नवा आत्मविश्वास रुजविला.