मविआचे जागावाटप जाहीर : शिवसेना २१, काँग्रेस १७, तर राष्ट्रवादीला १० जागा

महाविकास आघाडीच्या लोकसभा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला काय असणार याबाबत बरेच दिवस साशंकता होती. वंचितचा देखील आघाडीत समावेश करण्याचा प्रयत्न असल्याने जागावाटपाची बोलणी बरेच दिवस रखडली होती. त्यातच आघाडीत अंतर्गतही बरीच धुसफूस होती.
मविआचे जागावाटप जाहीर : शिवसेना २१, काँग्रेस १७, तर राष्ट्रवादीला १० जागा
Published on

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीत सुरू असलेला जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा अधिकृत फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. जागावाटपाच्या सूत्रानुसार, शिवसेना मोठा भाऊ ठरला असून शिवसेना ठाकरे गट २१ जागा, तर काँग्रेस १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस १० जागांवर लढणार आहे. सांगली ठाकरे गटाकडेच राहिली असून भिवंडी शरद पवार गटाला मिळाली आहे. सांगली पहिल्यांदाच काँग्रेसच्या हातून गेली आहे. सांगलीवरून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे.

महाविकास आघाडीच्या लोकसभा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला काय असणार याबाबत बरेच दिवस साशंकता होती. वंचितचा देखील आघाडीत समावेश करण्याचा प्रयत्न असल्याने जागावाटपाची बोलणी बरेच दिवस रखडली होती. त्यातच आघाडीत अंतर्गतही बरीच धुसफूस होती. वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी जागावाटप अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने वेगळी वाट चोखाळली. उद्धव ठाकरेंनी तर परस्पर उमेदवारही जाहीर केले होते. मात्र, बऱ्याच चर्चेअंती गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झाले.

मंत्रालयासमोरील ‘शिवालय’ येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. खासदार संजय राऊत यांनी आघाडीत कोणता पक्ष किती जागा आणि कुठे लढणार याची माहिती दिली.

भाजप हा भेकड जनता पक्ष - उद्धव ठाकरे

भाजप हा भेकड जनता पक्ष आहे. विरोधकांवर सत्तेचा दुरुपयोग करून धाडी घालून कारवाया करून पक्ष वाढविणारा पक्ष भेकडच असतो, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढविला. तसेच या पक्षाला एकही नेता तयार करता आला नाही. दुसऱ्या पक्षांचे नेते त्यांनी आयात केल्याने तो भाकड पक्ष आहे. भाजप हा खंडणीखोरांचा पक्ष आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी सोमवारी महाराष्ट्रात आले होते. तो दुर्मिळ योग होता. सूर्यग्रहण होते. अमावस्या होती आणि मोदींची सभा होती. अनेक वर्षांनंतर असा दुर्मिळ योग आला. तेव्हा जे भाषण झाले ते पंतप्रधानांचे नव्हते. ते एका पक्षाच्या नेत्याचे भाषण होते. त्यांनी आमच्यावर टीका केली. आता निवडणुका आहेत. त्यांनी एका पक्षाचा प्रचार करायला नको होता. उद्या आम्ही त्यांच्यावर टीका केली तर पंतप्रधानांवर टीका म्हणता येणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

उत्तर मुंबईतून विनोद घोसाळकर यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र, आता काँग्रेसला ही जागा सोडल्यानंतर घोसाळकर यांची समजूत काढणार का, असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, घोसाळकर यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. पण जागावाटपाच्या चर्चेत उत्तर मुंबई आम्ही लढायची की काँग्रेसने, याबाबत चर्चा सुरू होती. दिवस पुढे जात होते म्हणून घोसाळकर यांनी तयारी केली होती. पण आता घोसाळकर हे महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेना (ठाकरे गट)

दक्षिण-मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई, कल्याण, ठाणे, रायगड, रत्नागिरी, जळगाव, परभणी, नाशिक, मावळ, धाराशिव, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम.

काँग्रेस

उत्तर-मध्य मुंबई, उत्तर मुंबई, पुणे, नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, जालना, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)

बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण,

बीड.

logo
marathi.freepressjournal.in