
दसरा मेळाव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना शिवसेनेने थेट हायकोर्टात धाव घेतली आहे. दसरा मेळाव्याबाबत शिवसेनेच्या याचिकेवर गुरुवारी हायकोर्टात सुनावणी आहे. दरम्यान, युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर सडकून टीका करत, दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मिळाले नाही, तर राज्यात रामायण-महाभारत होईल, असा इशारा दिला आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा कोण घेणार, यावरून शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा एकदा भिडण्याची शक्यता आहे. बीकेसीतील एमएमआरडीएचे मैदान शिंदे गटाला देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे गटाने शिवाजी पार्क मैदान मिळण्यासाठी प्रथम अर्ज केलेला असला तरी शिवतीर्थ कोणाला मिळणार, याचे उत्तर अजूनही गुलदस्त्यातच आहे; मात्र दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर जमण्याचे आदेश ठाकरे गटाकडून देण्यात आले आहे.
“उद्धव सेना ही परंपरेप्रमाणे दरवर्षी शिवाजी पार्कवरील शिवतीर्थावर दसरा मेळावा घेते. यावर्षीही शिवसैनिक शिवतीर्थावरच मेळाव्यासाठी जाणार आहेत. शिवसैनिक कुणालाही जुमानणार नाहीत. उद्धव ठाकरेंसाठी लाखोंच्या संख्येने शिवतीर्थावर उपस्थित राहण्याचे आवाहन करत, बऱ्या बोलाने शिवसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी द्या, नाहीतर राज्यात रामायण-महाभारत होईल,” असा थेट इशारा कोळी यांनी दिला आहे.
ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनीही आक्रमक भूमिका घेताना शिवाजी पार्क सील केले तर ते तोडून टाकू; पण शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असे सांगितले.
म्हणूनच कायदा आणि सुव्यवस्था बिघडवली -पेडणेकर
शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या दसरा मेळाव्यावरुन शिवसेना विरुद्ध शिंदे गटातील वाद उफाळून आला आहे. दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानातच होतो. शिंदे गटाला बीकेसीतील मैदान मिळाले असताना मुंबई महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पहाणारे आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल शिवाजी पार्क मैदानाबाबत निर्णय जाहीर करत नाही. याचा अर्थ शिवसैनिकांना अडकविण्यासाठी कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम केले जात आहे, असा आरोप माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.