
गेल्या काही दिवसांपासून महादेव बेटिंग अॅप प्रकरण चांगलेचं चर्चेत आहे. आतापर्यंत पोलिसांनी अनेक जणांची या प्रकरणात चौकशी केली आहे. अशातच आता मुंबईत पोलिसांनी महादेव अॅप प्रकणात प्रवर्तक सौरभ चंद्रकर याच्यासह ३१ जनांवर गुन्हा दाखल केला आहे. जुगार, फसवणुकीच्या कलमातंर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हा गुन्हा महादेव अॅपऐवजी खिलाडी हे बेकायदेशीर बेटिंग अॅप चालवल्याप्रकरणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईमधील माटुंग्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयाने माटुंगा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार माटूंगा पोलिसांनी भारतीय दंडावर कलम ४२०,४६७ ४६८,, ४७१, १२० (ब) आणि जुगार कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
प्रकाश बनकर यांचा दावा आहे की, या आरोपीने खिलाडी बेटिंग अॅप वापरून सरकार आणि इतर अनेक लोकांची १५,००० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. खिलाडी अॅपच्या साहाय्याने आरोपी जुगार आणि इतर खेळ खेळत होते आणि त्यांनी तब्बल १५,००० करोडोंची कमाई केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सौरभ चंद्रकर हा छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी आहे. सौरभनं त्याचा मित्र रवी उप्पलसोबत 'महादेव ऑनलाईन अॅप' सुरू केलं होतं. या अॅपवर ऑनलाईन बेटिंग केली जाते. त्याच्या शाही विवाह सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटी देखील आले होते. या लग्नाच्या शाही थाटामुळे आणि खर्चामुळे हे लग्न ईडीच्या निशाण्यावर आलं आणि त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगचं सर्वात मोठं नेटवर्क उघड झालं होतं.