

मुंबई : महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ केशवराव खाड्ये मार्गावर मुंबई महापालिकेकडून बांधण्यात येत असलेल्या केबल उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर असून पुलाच्या आधारासाठी भव्य लोखंडी खांबाची उभारणी करण्यात येत आहे. पुलासाठी ७८.५ मीटर उंचीचा पायलॉन (लोखंडी खांब) उभारण्यात येत असून त्याचे ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पायलॉन, पोहोच रस्त्यासह सर्व कामे वेळेत पूर्ण करून ३१ ऑक्टोबरपर्यंत उड्डाणपूल तयार करण्याचे नियोजन असल्याची माहिती अतिरिक्त पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
महालक्ष्मी येथे होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने नवीन पूल बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलाच्या कामाची अतिरिक्त पालिका आयुक्त बांगर यांनी पाहणी केली. पालिका विभाग कार्यालय, वाहतूक पोलीस यांच्या समन्वयाने उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करण्याचे पूल विभागाचे प्रयत्न आहेत. उपायुक्त गिरीश निकम, उपप्रमुख अभियंता राजेश मुळ्ये उपस्थित होते.
खांबाचे असे होणार काम
पायलॉनच्या पश्चिम दिशेला ९५ मीटर व पूर्व दिशेला १६५ मीटर असे दोन स्वतंत्र 'स्पॅन' प्रस्तावित आहेत. यापैकी पायलॉनच्या पश्चिमेकडील ९५ मीटर लांबीच्या स्पॅनचे काम फेब्रुवारीअखेरपर्यंत तर पूर्वेकडील १६५ मीटर लांबीचा स्पॅन रेल्वेच्या हद्दीतील जागी उभारण्यात येणार आहे. हे काम १५ मार्च ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
असा आहे पूल
केशवराव खाड्ये मार्गावर महालक्ष्मी येथे उभारण्यात येणारा 'केबल स्टेड पूल' हा रेल्वे रुळांवरील महापालिकेचा पहिला केबल आधारित पूल आहे. महालक्ष्मी रेल्वे स्थानकानजीक पश्चिम रेल्वेवरून सात रस्ता ते महालक्ष्मी मैदान यांना हा पूल जोडतो. या पुलाची लांबी ८०३ मीटर तर रुंदी १७.२ मीटर आहे. रेल्वे हद्दीतील रुंदी २३.०१ मीटर इतकी आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामात येणाऱ्या झाडांचे संरक्षण व्हावे, यासाठी पालिकेने उड्डाणपुलाच्या आरखड्यात योग्य ते बदल केले आहेत.