महापरिनिर्वाण दिन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी दादर परिसर फुलला

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत हजारो अनुयायी हजारो मैलाचा प्रवास करून दाखल झाले आहेत. मुंबईतील दादर परिसर आणि शिवाजी पार्क डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी फुलून गेला आहे. केवळ बाबासाहेबांच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रवास करून अनुयायी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यात गरीब, वृद्ध यांचाही समावेश आहे.
महापरिनिर्वाण दिन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी दादर परिसर फुलला
Published on

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत हजारो अनुयायी हजारो मैलाचा प्रवास करून दाखल झाले आहेत. मुंबईतील दादर परिसर आणि शिवाजी पार्क डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी फुलून गेला आहे. केवळ बाबासाहेबांच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रवास करून अनुयायी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यात गरीब, वृद्ध यांचाही समावेश आहे.

७० वर्षीय दृष्टीहीन कचरू बनसोडे...

दादर रेल्वे स्थानकाबाहेर चाचपडत चैत्यभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जाऊ पाहणारे ७०वर्षीय कचरू बनसोडे सांगतात की, मी दृष्टीहीन आहे. मला जास्त शाळा शिकता आलेली नाही. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या समाजात विचारांचे जे तेज पसरवले आहे त्याने आम्हाला माणूसपणाची आणि प्रगतीची वाट गवसली आहे. मला प्रवासादरम्यान कितीही त्रास झाला तरी, मी माझ्या कुटुंबासोबत दरवर्षी अक्कलकोटपासून लांब असलेल्या खेडेगावातून महापरिनिर्वाण दिनी मुंबईत बाबासाहेबांना अभिवादन करायला येतो.

जेमतेम पैसे घेऊन बिहार टू दादर

बिहारच्या मनसापूर येथून आलेल्या रोहित जाटप या तरुणाने सांगितले की, मी आणि माझे ४० मित्र पहिल्यांदाच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दादरमध्ये आलो आहोत. आमच्याकडे जेमतेमच खर्चाचे पैसे आहेत. पण आमच्या मनात बाबासाहेबांविषयी असलेली ओढ आम्हाला इथपर्यंत घेऊन आली.

सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन आली महिला

हातात अवघ्या सहा महिन्यांचे बाळ असलेल्या प्रिया सांगतात की, मी लहानपणापासून शक्य तेव्हा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येते. त्यांनी आमच्या समाजावर केलेले उपकार हे आम्ही काही केले तरी फेडू शकणार नाही. महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन केल्याने मला नव्याने काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते.

न चुकता चैत्यभूमीवर येतो...

नागपूर जिल्ह्यातील आलगोंडी येथून आलेले ७५ वर्षीय कोंडिबा आढाव सांगतात की, मी दरवर्षी न चुकता चैत्यभूमीवर येत असतो. चैत्यभूमीवर येण्याची इतकी सवय आणि अनिवार इच्छा असते की त्यापुढे प्रवासाचा त्रास काहीच वाटत नाही. मध्य प्रदेशातील ३८ वर्षीय अशोक म्हणतात की, माझे शिक्षण सातवीपर्यंत झाले असले तरी मी बाबासाहेबांचे संविधान मानून भारतात हम सब एक है! या उद्देशानुसार राहत आहे.

डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम ६२ टक्के पूर्ण; स्मारकात ४६५ फुटांचा राष्ट्रध्वज उभारण्याची मागणी

दादर इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम सुरू आहे. आतापर्यंत स्मारकाचे ६२ टक्के काम पूर्ण झाले असून २०२६ अखेरीस स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य एमएमआरडीएने ठेवले आहे. या स्मारकात ४६५ फुटांचा राष्ट्रध्वज उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारणीसाठी राज्य सरकारने मार्च २०१३ मध्ये विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नियुक्ती केली आहे. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेशविकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) हे स्मारक उभारण्यात येत आहे. प्रथम स्मारकातील पुतळ्याची उंची २५० फूट निश्चित करण्यात आली होती. यानंतर सरकारने आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची ३५० फूट आणि चबुतरा १०० फूट असे एकूण ४५० फूट केली आहे. स्मारकाचे काम सध्या वेगाने सुरू असून ते २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य एमएमआरडीएने ठेवले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करणारे चंद्रकांत भंडारे आणि कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांनी नुकतीच स्मारकाच्या कामाची पाहणी केली. या पाहणीवेळी एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला स्मारकाचे काम ६२ टक्के पूर्ण झाल्याचे सांगितले. तसेच आंबेडकरांच्या सॅम्पल पुतळ्याचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर धातूमध्ये पुतळा बनविण्याचे काम सुरू होईल, असे भंडारे यांनी सांगितले.

स्मारकाकडे आंबेडकरी अनुयायांच्या नजरा

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. चैत्यभूमीजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उभारण्यात येत असलेले स्मारक कधी पूर्ण होणार याकडे अनुयायांच्या नजरा लागल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून स्मारकाचे काम सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी अनुयायांकडून होत आहे.

प्रतिमा, मूर्ती यांची विक्री सुरू

दादर पश्चिमेच्या रानडे रोडवर गेल्या दोन दिवसांपासून गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा, छोट्या मूर्ती, फोटो, छापील रिबीन, बाबासाहेबांचे फोटो छापलेले पेन, हातातील बँड, बिल्ले आणि कॅलेंडर विकणारे अनेक विक्रेते पाहायला मिळत आहेत. हे विक्रेते केवळ मुंबईच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यांतून इथे आले आहेत. काही महिला विक्रेत्या या रोडवर साहित्य विक्री करत आहेत.

समाजसेवी संस्थांचीही जय्यत तयारीमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांकरिता दादर चैत्यभूमी येथे सामाजिक संस्थांनी जय्यत तयारी केली आहे. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्यावतीने सैनिक दलाचे ३००० स्वयंसेवक या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. हे स्वयंसेवक चार ते सहा डिसेंबर दरम्यान अनुयायांना सेवा देणार आहेत. तर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ९०० पदाधिकारी कार्यरत करण्यात आले आहेत. ‘दामा’च्यावतीने २०० डॉक्टर तैनात करण्यात आले आहेत.

डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे स्वप्न अधुरेच भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केली खंत

घटनातज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुन्हा एकदा इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत चर्चा सुरू झाली आहे. सरकारकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. दिलेल्या वचनाप्रमाणे कामाची पूर्तता केली नाही, अशी खंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केली. ‘बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’च्या वतीने केलेल्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी ते बुधवारी चैत्यभूमीवर आले होते.

बेस्टकडून विशेष सोय

समाजातील दुर्बल घटक आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांसाठी बेस्टने स्वस्त व चांगली सेवा देण्याचा निर्णय घेतला. विविध बसमार्गावर अतिरिक्त बसेसची व्यवस्था अनुयायांसाठी केली आहे. स्मारकाला रोषणाई केली असून अखंड वीजपुरवठ्यासाठी जनरेटर्सची देखील व्यवस्था केली आहे. दैनंदिन बसपासद्वारे अनुयायी स्मृतिस्थळांचे दर्शन घेऊ शकतील. तसेच मुंबईतील विविध ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या अनुयायांकरिता माफक दरांत विशेष बस फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर बेस्टने मोफत वैद्यकीय तपासणी, प्रथमोपचार, मोफत नेत्र तपासणी, गरजूंना मोफत चष्मे वाटप व अल्पोपहार तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पुस्तके देखील मोफत पुरवण्याची व्यवस्था केली आहे.

लाखाहून अधिक अनुयायी दाखल होणार

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेने चालविलेल्या ७ विशेष एक्स्प्रेसमधून सुमारे १५ ते १८ हजार, तर इतर गाड्यांमधून सुमारे २०-२५ हजार अनुयायी गुरुवारी मुंबईमध्ये दाखल झाले असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. तसेच ६ डिसेंबर रोजी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखाहून अधिक अनुयायी दाखल होण्याची शक्यता असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले.

साडेतीन हजार पोलीस तैनात

महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून दादर व आसपासच्या परिसरात सुमारे साडेतीन हजार पोलीस तैनात केले आहेत. मुंबई पोलिसांकडून तीन अतिरिक्त पोलीस आयुक्त, पाच पोलीस उपायुक्त, चौदा सहाय्यक पोलीस आयुक्त, ३७० पोलीस अधिकारी, ३१०० पोलीस अंमलदार तसेच वाहतूक नियमनासाठी मुंबई पोलिसांकडून स्वतंत्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोबत एसआरपीएफ प्लाटून, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा कॉम्बॅक्ट, बीडीडीएस असा चोख पोलीस बंदोबस्त आहे.

logo
marathi.freepressjournal.in