राज्यात उष्णतेची लाट; अनेक शहरांत पारा ४० अंशाच्या पुढे

पुढील काही दिवसांमध्ये राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात उष्णतेची लाट; अनेक शहरांत पारा ४० अंशाच्या पुढे

काही दिवसांपूर्वी नवी मुंबईत उष्माघातामुळे १३ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर आता राज्यातील पारा कमालीचा वाढला असून, अनेक शहरांमध्ये तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. घराबाहेर पडल्यानंतर लोकांना उष्णतेच्या लाटेचा अनुभव येत असून, काही मिनिटांतच शरीर घामांनी चिंब भिजत आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या विभागांमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती आहे. तसेच रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, धुळे, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे नोंदवले गेले आहे. चंद्रपुरात तापमानाचा आकडा ४३.६ अंशांवर पोहोचल्यामुळे उष्णतेची तीव्रता लक्षात येते. पुढील काही दिवस चंद्रपुरात अशीच परिस्थिती राहणार आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वाशिमचे तापमानही ४२ अंशांवर, तर परभणीचा पारा ४१ अंशांपर्यंत गेला आहे. त्यामुळे राज्यात सकाळच्या वेळी रस्त्यांवर नागरिकांची गर्दीही कमी दिसू लागली आहे.

पुढील काही दिवसांमध्ये राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला असला, तरी पुण्यात मात्र पुढील दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

देशातही तापमान वाढले

उत्तर प्रदेशातील हमीरपूर आणि प्रयागराज इथे ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दिल्लीतील कमाल तापमान ४०.४ अंश सेल्सिअस नोंदवले आहे. पश्चिम बंगालमध्ये बांकुरा येथे सर्वाधिक ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, कोलकातामध्ये तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये उष्ण हवामानाची स्थिती कायम असून, दोन्ही राज्यांच्या बहुतांश भागात कमाल तापमान ४० अंशांच्या वर पोहोचले आहे. पंजाबमधील भटिंडा येथे ४१ आणि पटियालामध्ये ४१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

logo
marathi.freepressjournal.in