लव्ह जिहादवरून विधानसभेत गदारोळ; सत्ताधारी-विरोधक भिडले, तर अजित पवारांनी केली मध्यस्थी

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून मोठा गदारोळ पाहायला मिळाला
लव्ह जिहादवरून विधानसभेत गदारोळ; सत्ताधारी-विरोधक भिडले, तर अजित पवारांनी केली मध्यस्थी

आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लव्ह जिहाद प्रकरणावरून मोठा गोंधळ पाहायला मिळाला. राज्यात लव्ह जिहादची १ लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली असल्याची माहिती महिला, बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली. यावरून आज सभागृहात मोठा गोंधळ माजला. एकीकडे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मंत्री लोढांवर चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे समर्थन केले.

आमदार अबू आझमी म्हणाले की, "मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातल्या जनतेची माफी मागावी. कारण, त्यांनी सभागृहात चुकीची माहिती दिली आहे. लव्ह जिहाद नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही." अशी मागणी त्यांनी केली. तर, त्यांच्या या विधानाचे समर्थन करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची ही मागणी लावून धरली.

दरम्यान, त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील मैदानात उतरले. ते म्हणाले की, "ज्यांना वाटते की, लव्ह जिहाद नावाची गोष्ट अस्तित्वात नाही त्यांनी माझ्या गावी येऊन पाहावे. माझ्या गावातही अशी दोन प्रकाराने झाली आहेत." पुढे ते आमदार जितेंद्र आव्हाडांना म्हणाले की, "तुम्ही मुंब्र्यामध्ये राहता म्हणून बोलू नका. तुम्हाला त्यांची गरज आहे म्हणून बोलत आहात.” अशी टीका केली. भाजप आमदार आशिष शेलार यावर म्हणाले की, "मंगलप्रभात लोढांनी माफी का मागावी? ते हिंदू भगिनींसाठी बोलतात म्हणून माफी मागावी का?" असा सवाल केला.

यासर्व वाद थांबवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. ते म्हणाले की, "अध्यक्षांनी मला इतर विषयांवर बोलण्याची परवानगी द्यावी. मंगलप्रभात लोढांनी जो विषय मांडला, तसेच जितेंद्र आव्हाड, गुलाबराव पाटील, आशिष शेलार यांनी जे काही विधाने केली, त्यामधील योग्य काय ते घ्यावे आणि अयोग्य गोष्टींना बाजूला काढून पुढचे कामकाज सुरू करावे." अशी विनंती केल्यानंतर हे प्रकरण शांत झाले.

logo
marathi.freepressjournal.in