
मुंबई : रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळील समुद्राजवळ अजंठा कंपनीच्या कॅटमरॉन प्रवासी बोटीत पाणी शिरले. बोटीत १३० प्रवासी होते. मात्र वेळीच मदत मिळाल्याने १३० प्रवासी बचावले.
दरम्यान मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच त्रिसदस्य चौकशी समिती महाराष्ट्र सागरी मंडळाने स्थापन केली असून ती या दुर्घटनेची सविस्तर आणि सखोल चौकशी करणार असून तीन दिवसात समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे. तसेच दुर्घटनेतील बोटीचा प्रवासी वाहतुकीचा परवाना हा तत्काळ निलंबित करण्यात आला असून नोंदणी प्रमाणपत्र तसेच सर्वे प्रमाणपत्र देखील मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्र्यांच्या निर्देशानुसार तत्काळ निलंबित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या बोटीस पुढील आदेशापर्यंत प्रवासी वाहतूक करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
अजंठा कंपनीची प्रवासी बोट शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास १३० प्रवाशांना घेऊन गेटवे ऑफ इंडिया येथून मांडवा येथे जाण्यासाठी निघाली होती. भर समुद्रात मांडवा जेट्टी पासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर असताना
बोटीमध्ये समुद्राचे पाणी शिरल्याचे निदर्शनास आले. त्यावर बोटीवरील कर्मचाऱ्यांनी आणि प्रवाशांनी मांडवा जेट्टी येथे संपर्क साधून तातडीची मदत मागितली. मांडवा जेट्टी परिसरात समुद्रात असलेल्या बोटींनी तत्काळ प्रवाशांची मदत करून अपघातग्रस्त बोटीवरील प्रवाशांना दुसऱ्या बोटीमध्ये घेऊन मांडवा जेट्टी येथे बोटींमध्ये सुरक्षित व सुखरूपरीत्या पोहचवले.
त्रिसदस्य समिती नियुक्त
मंत्र्यांच्या या आदेशानुसार महाराष्ट्र सागरी मंडळाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये यांनी त्रिसदस्य समितीची घोषणा केली असून सागरी अभियंता चीफ सर्वेअर प्रकाश चव्हाण हे या समितीचे अध्यक्ष असणार असून, बांद्रा येथील प्रादेशिक बंदर अधिकारी सी. जे. लेपांडे हे सदस्य तर कमांडंट संतोष नायर जे सागरी सुरक्षा व संरक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत ते या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. ही समिती सदर घटनेची सविस्तर आणि सखोल चौकशी करून त्याबाबतचा सविस्तर आणि स्पष्ट अहवाल घटनेच्या कारणमीमांसासह तसेच शिफारसीसहित तीन दिवसात महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करणार आहे.