आता हुंडामुक्तीसाठी महाराष्ट्रात लढा! शरद पवार गटाची २२ जूनपासून मोहीम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने २२ जूनपासून राज्यात हुंडाबळी व हिंसामुक्त महाराष्ट्रासाठी लढा उभारण्याचा निर्धार केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, वैष्णवी कस्पटे- हगवणे हिचा वेदनादायक पद्धतीने हुंडाबळी झाला. ज्या राज्याने स्त्रीमुक्तीच्या दृष्टीने देशाला दिशा दाखविण्याचे काम केले तेथे वैष्णवीसारख्या लेकीचा बळी जाणे हे संतापजनक आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र सुन्न झाला असून यासाठी केवळ संताप आणि दुःख व्यक्त करून भागणार नाही तर जोरदारपणे कृतिशील जागृतीचे पाऊल उचलावे लागेल.
समाजातील सर्व घटकांचा, सर्व यंत्रणांनी यात सहभाग घ्यावा आणि मोहिमेतूनच ‘हुंडामुक्त महाराष्ट्र आणि हिंसामुक्त कुटुंबाचे’ उद्दिष्ट सध्या करता येईल आणि वैष्णवीला तीच श्रद्धांजली ठरेल, अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सुळे म्हणाल्या की, शरद पवार यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्याने तीन दशकांपूर्वी देशातील पहिले महिला धोरण २२ जून १९९४ रोजी जाहीर केले. ते धोरण तयार करण्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व घटकांनी आणि यंत्रणांनी आपले योगदान दिले होते. त्यामुळे अनेक सामाजिक, राजकीय, आर्थिक बदल राज्यातील महिलांच्या जीवनात घडले.
गेली ५० वर्षे राज्यामध्ये विविध संस्था, संघटना आणि व्यक्ती स्त्री पुरुष समतेची चळवळ कष्टाने आणि नेटाने पुढे नेत आहेत. हे सर्व पूर्वसंचित सोबत घेऊन येत्या २२ जूनपासून पुण्यातून मोहिमेची सुरुवात होणार आहे. वर्षभर वेगवेगळ्या टप्प्यात ही मोहीम राज्याच्या सर्व भागात राबविण्यात येणार असून मोहिमेचे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत याचा पाठपुरावा करणार आहोत.
- सुप्रिया सुळे, खासदार