मुंबईत ७६ क्रिटिकल मतदान केंद्रे; लोकसभेच्या तुलनेत मतदारांत २९१०८७ वाढ, मतदार यादीत एक कोटी दोन लाख २९ हजार ७०८ नावे

Maharashtra assembly elections 2024: बुधवारी होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण मुंबईत एकूण १० हजार ११७ मतदान केंद्रे असून त्यापैकी ७६ क्रिटिकल या वर्गात मोडतात. पण, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने मुंबईत एकही मतदान केंद्र संवेदनशील नाही, अशी माहिती मुंबईचे (शहर आणि उपनगर जिल्हा) जिल्हा निवडणूक अधिकारी तथा पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सोमवारी दिली
मुंबईत ७६ क्रिटिकल मतदान केंद्रे; लोकसभेच्या तुलनेत मतदारांत २९१०८७ वाढ, मतदार यादीत एक कोटी दोन लाख २९ हजार ७०८ नावे
Published on

मुंबई : बुधवारी होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण मुंबईत एकूण १० हजार ११७ मतदान केंद्रे असून त्यापैकी ७६ क्रिटिकल या वर्गात मोडतात. पण, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने मुंबईत एकही मतदान केंद्र संवेदनशील नाही, अशी माहिती मुंबईचे (शहर आणि उपनगर जिल्हा) जिल्हा निवडणूक अधिकारी तथा पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सोमवारी दिली.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर मुंबई शहर जिल्ह्यात ५३ हजार ३७२ तर, उपनगर जिल्ह्यात दोन लाख ३७ हजार ७१५ असे एकूण दोन लाख ९१ हजार ०८७ मतदार वाढले आहेत. बुधवारी, २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मुंबईतील मतदार याद्यांत एकूण एक कोटी दोन लाख २९ हजार ७०८ मतदारांची नावे आहेत. यात ५४ लाख ६७ हजार ३६१ पुरुष, ४७ लाख ६१ हजार २६५ महिला तर, १,०८२ तृतीयपंथी आहेत. यात ओव्हरसिज मतदार २२८८, दिव्यांग २३ हजार ९२७, ८५ वर्षांवरील मतदार एक लाख ४६ हजार ८५९ आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

गेल्या निवडणुकीत ज्या ठिकाणी अल्प म्हणजे १० टक्क्यांहून कमी मतदान झाले होते, किंवा एकाच उमेदवाराला तुलनेत अधिक मते मिळाली होती अशा सहा विविध निकषांवर क्रिटिकल मतदान केंद्रे ठरविली जातात. ही बाब तांत्रिक आहे. अशी १३ केंद्रे शहरात तर, ६३ उपनगरात आहेत. पण कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहर किंवा उपनगरात एकही केंद्र संवेदनशील आढळलेले नाही. निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांनीही पाहणीनंतर त्यास दुजोरा दिला आहे, अशी माहिती गगराणी यांनी दिली. शहरात कुलाबा, नेव्हीनगर तर, उपनगरात मालाड, जुहू आदी ठिकाणी अशी केंद्रे आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीतही मुंबईत एकही मतदान केंद्र संवदनशील या वर्गात मोडणारे नव्हते.

मॉडेल मतदान केंद्रे

मुंबईत महिला संचलित मतदान केंद्रे शहरात १२, उपनगरात २६ अशी एकूण ३८, तरुण कर्मचाऱ्यांकडून संचलित केंद्रे शहरात १२, उपनगरात २६ अशी ३८ आणि दिव्यांगांद्वारे संचलित केंद्रे शहरात आठ आहेत.

मुंबईतील निवडणूक

एकूण मतदारसंघ- ३६

एकूण उमेदवार- ४२०

मतदानाचे ठिकाण (लोकेशन)- २,०८५

मतदान केंद्र- १०,११७

मुंबईतील ईव्हीएम

बॅलेट युनिट- १४,१७२

कंट्रोल युनिट- १२,१२०

व्हीव्हीपॅट- १३,१३१

logo
marathi.freepressjournal.in