वांद्रे पूर्वमध्ये तिरंगी लढतीचा फायदा कुणाला? झिशान सिद्दीकी, वरुण सरदेसाई आणि तृप्ती सावंत यांच्यात लढत

दोन सार्वत्रिक निवडणुका आणि एक पोटनिवडणूक असा सलग तीन वेळेस राखलेला वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचा गड शिवसेनेने २०१९ मध्ये अंतर्गत बंडाळीमुळे गमावला.
वांद्रे पूर्वमध्ये तिरंगी लढतीचा फायदा कुणाला? झिशान सिद्दीकी, वरुण सरदेसाई आणि तृप्ती सावंत यांच्यात लढत
Published on

शिरीष पवार

मुंबई : दोन सार्वत्रिक निवडणुका आणि एक पोटनिवडणूक असा सलग तीन वेळेस राखलेला वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचा गड शिवसेनेने २०१९ मध्ये अंतर्गत बंडाळीमुळे गमावला. तेथे पुन्हा ठाकरे सेनेचा झेंडा फडकावण्यासाठी वरुण सरदेसाई यांना मैदानात उतरवण्यात आले असताना, गेल्या वेळेस बंडखोरी केलेल्या तृप्ती सावंत या आता मनसेचा झेंडा हाती घेऊन पुन्हा उभ्या ठाकल्या आहेत. काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी हे पुन्हा पूर्ण तयारीने मैदानात उतरल्याने, या लढतीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता राज्यभरात लागून राहिली आहे.

झिशान सिद्दीकी हे येथून गेल्या वेळी काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले होते. पण त्यांचे पिता आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत जेथे वाद होते, त्यामध्ये वांद्रे पूर्वची जागा होती. कारण २०१९ मध्ये काँग्रेसचे उमेदवार असलेल्या झिशान सिद्दीकी यांनी ही जागा शिवसेनेच्या विरोधात जिंकली होती.

त्यावेळी सिद्दीकी यांना ३८ हजार ३३७, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे विश्वनाथ पांडुरंग महाडेश्वर यांना ३२ हजार ५४७ मते मिळाली होती. सिद्दिकी यांचे मताधिक्य ५७९० होते, पण त्यांची एकूण मते ३०.३८ टक्के होती. महाडेश्वर यांची एकूण मते २५.७१ टक्के होती. तर, त्यांच्या विरोधात पक्षातून बंडखोरी केलेल्या तृप्ती प्रकाश सावंत यांनी २४ हजार ७१ म्हणजेच १९.०१ टक्के मते मिळवली होती. याच मतदारसंघातील शिवसेनेचे दिवंगत आमदार असलेल्या प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या त्या पत्नी होत. २०१५ मध्ये आमदार बाळा सावंत यांचे निधन झाल्यानंतरच्या पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत यांनाच शिवसेनेने उमेदवारी दिली होती आणि त्यांनी सहानुभूतीच्या लाटेत ५१.१४ टक्के मते मिळवून काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री नारायण राणे (३२.७० टक्के मते) यांना पराभूत केले होते. पण नंतर २०१९ मध्ये निवडणूक लागताच शिवसेनेने तृप्ती सावंत यांना डावलून महाडेश्वर यांना तिकीट दिले होते. महाडेश्वर आणि सावंत यांच्या संघर्षात काँग्रेसचे सिद्दीकी यांचा विजय झाला होता.

मतदारसंघातील समस्या

* अपुरा, गढूळ पाणीपुरवठा

* वाहतूककोंडी

* रस्ते, पदपथावरील अतिक्रमणे

* वांद्रे शासकीय वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने घरे देण्याचा प्रश्न

logo
marathi.freepressjournal.in