मुंबई : विधानसभा निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी पार पडल्यानंतर संबंधित निवडणूक कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशी, २१ नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंत तेथे थांबावे लागणार आहे. त्यामुळे महापालिकेतील ज्या कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती झाली आहे, त्यांना २१ तारखेला पालिकेच्या कामासाठी बोलविण्यात येऊ नये, अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक २० तारखेला होणार आहे. या निवडणुकीच्या कामकाजासाठी मुंबई महापालिकेतील ५२ हजार कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यापैकी १० हजार कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या पदावर निवडणुकीचे कामकाज करत आहेत. या सर्व कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामकाजाकरिता विविध पदांची (उदा. क्षेत्रिय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, शिपाई इत्यादी) जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
निवडणुकीचे कामकाज लक्षात घेता, अत्यंत जोखमीचे व जिकीरीचे असल्याने संबंधित कर्मचारी हे मानसिक तणावाखाली असतात.
हे लक्षात घेता, संबंधित सर्व कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी २१ तारखेचा दिवस निवडणूक कर्तव्यार्थ समजून त्यांना त्या दिवशी पालिकेच्या कामासाठी बोलविण्यात येऊ नये, अशी या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मागणी आहे. ती रास्त आहे, असे मत युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात व्यक्त केले आहे.
४० ते ४५ तास सलग कामकाज
निवडणूक साहित्य व मतदान यंत्रे ताब्यात घेण्याकरिता १९ तारखेला सकाळी ८ वाजता संबंधित निवडणूक कार्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे. हे साहित्य घेऊन नेमून दिलेल्या मतदान केंद्रात जाऊन तेथे मतदान केंद्राची उभारणी, आवश्यक ते नियोजन करावे लागणार आहे. त्या दिवशी तेथेच मुक्काम करून २० तारखेला पहाटे ५ वाजता प्रत्यक्ष निवडणुकीच्या कर्तव्यासाठी उपस्थित रहावे लागणार आहे. २० तारखेला मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे व मतदान यंत्रे जमा करेपर्यंत संबंधितांना नेमून दिलेले ठिकाण सोडता येणार नाही. हे सर्व कामकाज पार पाडण्याकरिता २१ तारखेच्या सकाळपर्यंत थांबावे लागणार आहे. म्हणजेच सुमारे ४० ते ४५ तास सलग कामकाज करावे लागणार आहे.