मुंबई : दक्षिण मुंबईमध्ये मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक इमारती या शंभर वर्षांहून अधिक जुन्या आहेत. मुंबईतील जुन्या इमारतींचा समूह पुनर्विकास करण्याकरिता समूह पुनर्विकासाची अट शिथिल करण्यासाठी पाठपुरावा करत आहे. समूह पुनर्विकासाची अट ३ हजार ५०० पर्यंत शिथिल केल्यास दक्षिण मुंबईसह मुंबईतील अनेक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास भायखळा विधानसभा क्षेत्राच्या शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी व्यक्त केला.
यामिनी जाधव यांनी शुक्रवारी दैनिक 'नवशक्ती' आणि 'फ्री प्रेस जर्नल'च्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत दिलखुलास संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, भायखळा विधानसभा मतदारसंघात अनेक जुन्या इमारती असून त्यांचे आयुर्मान १०० वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारने गृहनिर्माण धोरणामध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार या इमारतींच्या पुनर्विकासासाठी इमारत मालकाला प्रशासनाला सहकार्य करावे लागते. इमारत मालकाने सहा महिन्यांत पुनर्विकासात स्वारस्य न दाखवल्यास रहिवाशांना पुनर्विकासाची संधी देण्यात येते. त्यांनीही दिलेल्या मुदतीमध्ये पुनर्विकासाची प्रक्रिया पूर्ण न केल्यास म्हाडामार्फत इमारत ताब्यात घेऊन इमारतीचा पुनर्विकास करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला असल्याचे जाधव म्हणाल्या.
नागपाडा, मदनपुरा या भागात जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींची संख्या अधिक असल्याने या ठिकाणी समूह पुनर्विकास होणे गरजेचे आहे. समूह पुनर्विकासाला गती येण्यासाठी ४ हजार मीटरची मर्यादा थोडी शिथिल करण्याची गरज आहे. ते झाल्यास मुंबईतील जुन्या इमारतींचा पुनर्विकास मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भायखळा मतदारसंघात अनेक ठिकाणी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या प्रशासनाच्या जमिनी आहेत. या जमिनीवर बांधकामे झाली असून येथील नागरिकांना प्राथमिक सुविधा पुरविण्यात अडचणी येत आहेत. या ठिकाणी कामे करण्यासाठी संबंधित प्रशासनाची परवानगी घ्यावी लागले. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने धोरण तयार केल्यास नागरिकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होतील, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
लकडा बंदरमध्ये नौदलाचे मुख्यालय आहे. मात्र समुद्रात ग्रस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ऑफिस नाही. त्यांना उघड्यावर कपडे बदलावे लागतात. त्यांना आमदार निधीतून शेड उभारून देण्यात आली आहे. यासोबतच त्यांना समुद्रात गस्त घालण्यासाठी अत्याधुनिक स्पीड बोट नाही. राष्ट्रीय सुरक्षेचा हा मुद्दा मी हाती घेतला असल्याचे जाधव यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी केवळ १२ दिवस मिळाले. या निवडणुकीत मी हरले नाही. केवळ ५२ हजार मते कमी पडली आहेत. आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. आता लोकांना भेटणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार प्रचार सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. काही लोक आम्हाला गद्दार म्हणतात, पण उबाठामधून खुद्दार माझ्या विरोधात आले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस असे पक्षांतर केलेल्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली आहे. मतदारसंघातील अनेक नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केले आहे. असे राम सावंत, बबन गावकर, रमाकांत रहाटे या ज्येष्ठ नेत्यांना डावलून ठाकरे सेनेने चार वर्षांपूर्वी आलेल्या व्यक्तीला उमेदवारी देऊन वरिष्ठांवर अन्याय केला असल्याचा आरोप जाधव यांनी केला.
‘लाडकी बहीण’ला मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद
राज्य सरकारने राबवलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजवर मतदारसंघातील ४६ हजार महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. लाभार्थ्यांचे मेळावे घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्याऐवजी मीच मतदारसंघातील ३० ठिकाणी लाभार्थी महिलांसोबत संवाद साधला.
बुरखा वाटप दरवर्षी होणार
मुस्लिमांना नेहमी टार्गेट करण्यात येते. त्यांना का टार्गेट केले जाते हे कळत नाही. मुस्लिम समाज हा आपल्या समाजाचा भाग आहेत. त्यांना देवाने बुद्धी, मन दिले आहे. त्यांची कामे लोकप्रतिनिधी म्हणून करणे आपले कर्तव्य आहे. बुरखा प्रकरणात मला ट्रोल करण्यात आले. पण त्यामुळे मी माझी भूमिका मांडू शकले. दिवाळी दरवर्षी येते. त्याप्रमाणे बुरखा वाटप दरवर्षी होईल, असे संकेतही जाधव यांनी यावेळी दिले.