गिरीश चित्रे / मुंबई
विधानसभा निवडणुकीत दोन शिवसेना आमनेसामने उभ्या ठाकल्या आहेत. एकेकाळच्या शिवसेनेतील दोन मित्रांनी विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात थंड थोपटले आहेत. महायुतीचे तुकाराम काते, तर मविआचे प्रकाश फातर्पेकर हे चेंबूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. येथे काते अन् फातर्पेकर या दोघांत चुरशीची लढत होणार असल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. दरम्यान, महायुतीतील भाजपचा हिंदुत्वाचा नारा यामुळे मुस्लिम मतांची महायुतीला किती पसंती मिळते हे २३ नोव्हेंबर रोजी निकालानंतर स्पष्ट होईल.
विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे मतपेटीतून आपल्याला मतदारांचा कौल मिळावा यासाठी उमेदवार मतदारसंघ पिंजून काढत आहेत. सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप यांच्यासह अन्य पक्ष, अपक्ष, बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. २८८ मतदारसंघांत अनेक जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना, तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी मॅच होणार आहे. चेंबूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या मतदारसंघातून प्रकाश फातर्पेकर दोन वेळा विजयी झाले आहेत. त्यात शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्याने त्यांना उद्धव ठाकरे यांनी तिसऱ्यांदा संधी दिली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून तुकाराम काते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात प्रथमच शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे २०१९ मध्ये शिवसेनेच्या प्रकाश फातर्पेकर यांना ५३२६४ मते मिळाली होती, जी एकूण मतदानाच्या ४०.१५ टक्के इतकी होती. तर काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. या मतदारसंघात सुरू असलेली विविध विकासकामे, पुनर्विकास प्रकल्प हा प्रचाराचा मुद्दा ठरणार आहे.
मुंबईच्या पूर्व उपनगरातील सर्वात वेगाने विकसित होणारी प्राईम लोकॅलिटी म्हणून चेंबूर विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. झपाट्याने उभ्या राहणाऱ्या निवासी इमारती, मेट्रो-मोनो रेल सारख्या पायाभूत सुविधांमुळे इथल्या रियल इस्टेट मार्केटला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. मात्र तरीही चेंबूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला अजूनही झोपडपट्ट्या आहेत. चेंबूरमधल्या नागरिकांना सर्वाधिक भेडसावणारा प्रश्न म्हणजे रखडलेला पुनर्विकास आणि विकासकांकडून होणारी फसवणूक हा मुद्दा चर्चेतला आहे.
मराठी, दलित आणि उत्तर भारतीय मते निर्णायक
चेंबूरच्या लोकसंख्येकडे पाहता या मतदारसंघात मराठी टक्का मोठा आहे. तसेच दलित आणि उत्तर भारतीय मतेही निर्णायक ठरतात. तसेच दक्षिण भारतीय आणि सिंधी-पंजाबींचे वर्चस्व असणारे काही भाग आहेत. त्यामुळे एकूणच हा मतदारसंघ संमिश्र अशा स्वरूपाचा आहे. पूर्वी काँग्रेसमधून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांचा या परिसरात दबदबा होता. मात्र २०१४ ला शिवसेनेने येथे मुसंडी मारली. शिवसेनेचे प्रकाश फातर्पेकर येथून निवडून आले. आता फातर्पेकर विरोधात तुकाराम काते यांच्यात खरी लढत होईल. दोन्ही शिवसेना आमनेसामने असून बाजी कोण मारणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.
मतदार
पुरुष - १,३४,८२९
महिला - १,२३,३९७
तृतीयपंथी - १०
एकूण - २,५८,२३६