घाटकोपर पूर्व : नवकोट नारायणाचा कोट भेदण्याचे आव्हान; भाजपच्या पराग शहा यांच्याशी मविआच्या राखी जाधव यांचा मुकाबला

Maharashtra Assembly Elections 2024 : घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघातील भाजपचे विद्यमान आमदार आणि उमेदवार पराग शहा हे या विधानसभा निवडणुकीतील राज्यातील सर्वात श्रीमंत, नवकोट नारायण उमेदवार ठरले असून त्यांचा कोट (किल्ला) भेदण्याचे आव्हान महाविकास आघाडीच्या उमेदवार राखी हरिश्चंद्र जाधव यांच्यापुढे आहे.
घाटकोपर पूर्व : नवकोट नारायणाचा कोट भेदण्याचे आव्हान; भाजपच्या पराग शहा यांच्याशी मविआच्या राखी जाधव यांचा मुकाबला
Published on

शिरीष पवार / मुंबई

घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघातील भाजपचे विद्यमान आमदार आणि उमेदवार पराग शहा हे या विधानसभा निवडणुकीतील राज्यातील सर्वात श्रीमंत, नवकोट नारायण उमेदवार ठरले असून त्यांचा कोट (किल्ला) भेदण्याचे आव्हान महाविकास आघाडीच्या उमेदवार राखी हरिश्चंद्र जाधव यांच्यापुढे आहे.

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर २००९ आणि २०१४ मध्ये भाजपाचे प्रकाश मेहता हे मतदारसंघाचे आमदार होते. २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये प्रकाश मेहता यांच्यावर गैरव्यवहारचे आरोप झाले. त्यानंतर २०१९ मध्ये घाटकोपर पूर्वची भाजपची उमेदवारी त्यावेळी नगरसेवक असलेले पराग शहा यांना मिळाली होती. ते ५३ हजार ३१९ मतांनी निवडून आले. त्यांच्या मतांची टक्केवारी ५७.७० टक्के होती. त्यांचे प्रतिस्पध मनसेचे सतीश पवार यांना १९ हजार ७३५ तर काँग्रेसच्या मनीषा सूर्यवंशी यांना १५ हजार ७५३ मते मिळाली होती.

दोनवेळा आमदार राहिलेले प्रकाश मेहता हे पुन्हा एकदा भाजपाच्या उमेदवारीच्या स्पर्धेत होते. परंतु भाजपची उमेदवारी यावेळीसुद्धा पराग शहा यांना मिळाली आहे.

यावेळी महायुतीतर्फे भाजपचे शहा, महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या राखी जाधव यांच्यासह मनसेचे संदीप कुलचे, वंचित बहुजन आघाडीच्या सुनिता गायकवाड, स्वाभिमान पक्षाचे हुसेन शेख आणि अन्य तीन अपक्ष असेल एकूण आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राखी जाधव या माजी नगरसेविका आहेत. आघाडीतील शिवसेना (ठाकरे) तसेच काँग्रेस अशा घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा समन्वय आहे.

मतदारसंघात गुजराती भाषिकांचे प्राबल्य आहे. शिवाय मराठी भाषिकांची संख्याही लक्षणीय आहे. उत्तर भारतीय तसेच अन्य भाषिक मतदारही आहेत. प्रामुख्याने येथील गुजराती समाज हा भाजपाचा मुख्य पाठीराखा राहिल्याचे मानले जाते.

भाजपमधील नाराजी पथ्यावर पाडून घेत, तसेच गुजराती, मराठी, इतर भाषिक अशा सर्वच मतदारांचा विश्वास संपादन करून महाविकास आघाडीच्या जाधव या भाजपाचे शहा यांच्याशी कशा प्रकारे लढतात, हे मतमोजणीतूनच दिसून येणार आहे. बांधकाम व्यावसायिक असलेल्या पराग शहा यांनी या वेळच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती ३३८३ कोटी रुपये इतकी जाहीर केली आहे. पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत ५७५ टक्के वाढ झाली आहे.

मतदार

पुरुष : १ लाख ३० हजार ०७०

महिला : १ लाख ११ हजार ४४४

एकूण मतदार

२ लाख ४९ हजार ५३६

logo
marathi.freepressjournal.in