मुंबई : अडीच वर्षांपूर्वी आपले सरकार सुरळीतपणे सुरू होते. आपले सरकार त्यांनी कोणत्या पद्धतीने पाडले आणि आपल्या माथ्यावर, आपल्या इच्छेविरुद्ध कशाप्रकारे सरकार बसवण्यात आले. अडीच वर्षांपासून आपण न्याय मागत आहोत. पण अजूनही न्याय मिळत नाही. न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणे असे म्हटले जाते. आम्हालाही एकप्रकारे न्यायालयाकडून न्याय नाकारला जात आहे. लोकमान्य टिळकांनी म्हटल्याप्रमाणे मी आपल्या दरबारात न्याय मागण्यासाठी आलो आहे, असे आवाहन सोमवारी उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले.
निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी प्रचार संपण्याच्या काही तास आधी मतदारांना भावनिक आवाहन केले. ‘सध्या महाराष्ट्र लुटण्याचे, गुलाब बनवण्याचे काम सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. माझ्याकडून त्यांनी आपला पक्ष, निशाणी सगळे हिसकावून घेतले. पण त्यांना तुमचे प्रेम माझ्याकडून घेता आले नाही. मी केवळ आपल्या आशीर्वादामुळे ठामपणे उभा आहे. महाराष्ट्रातील बेबंदशाही रोखण्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा, असे भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
ही महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई
ही लढाई मला काही मिळवण्यासाठी नाही, तर देशातील लोकशाही टिकवण्यासाठी मला तुमची सोबत पाहिजे. या लढाईत केवळ माझ्या नाही, तर महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राला लुटायचे, गुलाम बनवण्याचे काम सुरू आहे आणि आपण ते डोळ्यादेखत होऊ द्यायचे? हे मला तरी पटत नाही. त्यामुळे या लढाईत सहकुटुंब उतरा. आपल्या कुटुंबातील सर्व मतदारांनी या लढाईत सहभाग घ्या. जिद्दीने उतरून ही बेबंदशाही आपल्या मताने जाळून भस्म करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.