मुंबई : महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. याच मातीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, तर लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी देशाला विचार दिले. महायुतीची विचारधारा प्रगतीचा विचार करणारी असून महाविकास आघाडी महाराष्ट्राचा अपमान करण्याचे काम करत आहे. महाविकास आघाडीचे लोक लांगूलचालनाचे गुलाम झाले आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शिवतीर्थावर झालेल्या सभेत केली.
राम मंदिराच्या विरोधात असलेली भगवा दहशतवाद अंगिकारणारी आणि वीर सावरकरांचा अपमान करणारी ही मविआ आहे. मला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेम मिळाले आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणानंतर आता मी मुंबईतील जनतेशी संवाद साधत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद महायुतीसोबत आहे. भाजप महायुती आहे तर गती आहे आणि महाराष्ट्राची प्रगती आहे, अशी लोकांची भावना आहे. असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात सत्तास्थापनेचा विश्वास व्यक्त केला.
यंदाच्या विधानसभेची आचारसंहिता लागण्यास आणखीन काही दिवस शिल्लक असले तरी ही पंतप्रधानांची राज्यातील शेवटची सभा होती. “देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक दशके काँग्रेसचे केंद्रात आणि महाराष्ट्रात सरकार होते. पण मुंबईसाठी त्यांनी कुठल्या प्रकल्पाची, योजनांची आखणीच केली नाही. काँग्रेसचे धोरण मुंबईच्या अगदी विरोधात आहे. मुंबई म्हणजे कष्ट, पुढे जाणे आणि प्रामाणिकपणा. पण काँग्रेसला फक्त भ्रष्टाचार येतो आणि विकासाच्या कामांमध्ये खोडा घालणे. त्यांनी मेट्रोला, अटल सेतूला विरोध दर्शवला होता. आम्ही यूपीआय आणि डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहिले, तेव्हा काँग्रेसवाले खिल्ली उडवायचे. अशा विचारधारेचे लोक मुंबईला पुढे नेऊ शकत नाही. मुंबई एकमेकांना जोडण्याचा विचार करते. या शहरात सगळ्या जाती, धर्माचे लोक राहतात. मात्र काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे लोक हे जाती-पातीमध्ये भांडणे लावत आहेत,” असा आरोपही नरेंद्र मोदींनी यावेळी केला.
यांनीच मराठीला अभिजात भाषेचादर्जा मिळू दिला नाही
“महाविकास आघाडीची विचारधारा महाराष्ट्राला अपमानित करत आहे, मविआचे लोक तुष्टीकरणाच्या आहारी गेले आहेत. हीच आघाडी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करत आहे. यांनीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळू दिला नाही. पण आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, तेव्हा यांना पोटशूळ उठले. मविआचे राजकारण हे महाराष्ट्र आणि देशविरोधी आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने सावध राहावे,” असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले. दादर येथील शिवाजी पार्क मैदानात महायुतीच्या जाहीर सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विनोद तावडे, मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, आशीष शेलार, योगेश सागर, पियूष गोयल आदी नेते उपस्थित होते.
“मुंबई हे शहर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे. पण बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांच्या हाती शिवसेना दिली. मुंबई सपनों का शहर अन् मुंबईचे स्वप्न साकारणारी एकच युती ती म्हणजे भाजप महायुती. काँग्रेसच्या काळात मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शेकडो लोकांचा जीव गेला तर हजारो लोक जखमी झाले. मात्र गेल्या १० वर्षांत मोदी सरकार सत्तेत आले आणि दहशतवाद कायमचा मिटवून टाकला. मुंबई आता दहशतवादमुक्त झाली,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंचा रिमोट कंट्रोल काँग्रेसकडे
राहुल गांधी यांच्या तोंडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कौतुक करून दाखवा. वीर सावरकरांना शिव्या देणाऱ्या लोकांसोबत हे लोक सोबत फिरत आहेत. राहुल गांधी हे ज्यादिवशी बाळासाहेबांचे कौतुक करतील, त्या दिवशी तुम्हाला चांगली झोप लागेल. रुग्णालयात जायची गरज लागणार नाही. उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचा रिमोट कंट्रोल काँग्रेसकडे दिला असल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी लगावला.
अजित पवारांची गैरहजेरी
महायुतीची जाहीर सभा गुरुवारी दादर येथील शिवाजी पार्क मैदानात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बडे नेते उपस्थित होते. मात्र महायुतीतील तिसऱ्या घटक पक्षाचे प्रमुख म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अप) राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार सभेला गैरहजर असल्याने महायुतीत तणाव, अशा चर्चेला उधाण आले आहे.