पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी समाजामध्ये फूट पाडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार यांनी शुक्रवारी येथे केला. ज्यांनी भाजपशी संधान बांधले आहे अशांचे परतीचे दोर आपण कापून टाकले असल्याचा सूचक इशाराही त्यांनी दिला.
निवडणुकीनंतर अजित पवार यांचा आपल्या पक्षामध्ये पुनर्प्रवेश होईल का, असे विचारले असता शरद पवार यांनी भाजपशी संधान बांधलेल्या पक्षांचे परतीचे दोर आपण कापले असल्याचे स्पष्ट केले. नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारामध्ये ज्या पद्धतीची भाषणे केली त्यावर पवार यांनी टीका केली आणि सत्तारूढ महायुतीबद्दल जनतेच्या मनात खदखदत असलेल्या असंतोषाचा फायदा महाविकास आघाडीला होईल, असे सांगितले.
लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांनी महायुतीला नाकारले. त्यामुळे बिथरलेली महायुती कोणत्याही प्रकारे सत्ता काबीज करण्यासाठी विविध योजना राबवित आहे, मात्र मतदार त्यांना यावेळीही नाकारतीलच, असे शरद पवार यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे घोषणेवरही त्यांनी यावेळी टीका केली. आदित्यनाथ जातीयवादी वक्तव्ये करण्यासाठी प्रसिद्धच आहेत, त्यामुळे त्याला महत्त्व का द्यावे, आपण त्यांच्याबद्दल एक वाक्यही बोलू इच्छित नाही. भगवी वस्त्रे परिधान करावयाची आणि जातीयवादाला थारा द्यावयाचा असे हे लोक आहेत, असेही ते म्हणाले.
मोदीच समाजात पाडताहेत फूट
महाविकास आघाडी जातीच्या नावावर फूट पाडत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आहे, असे विचारता पवार म्हणाले की, ते स्वत:च समाजात फूट पाडत आहेत हे त्यांच्या निवडणूक प्रचारांमधील भाषणांवरून स्पष्ट होईल. राज्यभर प्रचार करताना आपल्याला सत्तारूढ महायुतीबद्दल जनतेच्या मनात प्रचंड खदखद असल्याचे जाणवले, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.