शिरीष पवार/ मुंबई
विधानसभेच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपचे पराग अळवणी यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणारा तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपला मोठी आघाडी देणाऱ्या विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाची ओळख सध्या भाजपचा सुरक्षित गड अशी सांगितली जाते. हा गड भेदण्याचे आव्हान यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षापुढे असून मनसेनेही आपला उमेदवार मैदानात उतरवला आहे.
१९८७ च्या पोटनिवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले रमेश प्रभू यांनी हिंदुत्वाच्या नावाने मते मागितल्याच्या तक्रारीनंतर प्रभू यांच्यासह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही मतदानाचा अधिकार सहा वर्षे निलंबित करण्यात आला होता. या घटनेमुळे देशभरात हा मतदारसंघ परिचित झाला. १९९० मध्ये पुन्हा प्रभू हे शिवसेनेच्या उमेदवारीवर येथून निवडून आले होते. १९९५ मध्ये गुरुनाथ देसाई आणि १९९९ मध्ये विनायक राऊत यांनी शिवसेनेची ही जागा कायम राखली होती. त्यानंतर २००४ मध्ये काँग्रेसचे अशोक जाधव आणि २००९ मध्ये काँग्रेसचेच कृष्णा हेगडे येथून निवडून आले होते.
२००९ मध्ये मनसेचे शिरीष पारकर यांनी तब्बल ३५ हजार १५६ मते घेतल्याने शिवसेनेचे विनायक राऊत हे (४२ हजार ६३४ मते) पराभूत झाले होते. काँग्रेसचे हेगडे यांचा त्यावेळी १६०४ मतांनी विजय झाला होता. २०१४ मध्ये मात्र युतीमधील शिवसेना आणि भाजप हे पक्ष वेगवेगळे लढूनही नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेत भाजपचे पराग अळवणी यांनी येथून ७४,२७० मते मिळवून विजय मिळविला होता. त्यांचे मताधिक्य ३२ हजार ४३५ इतके होते. शिवसेनेचे शशिकांत पाटकर यांना ४१ हजार ८३५, तर काँग्रेसच्या कृष्णा हेगडे यांना २४,१९१ मते मिळाली होती. २०१९ मध्ये पुन्हा भाजपचे पराग अळवणी येथून ८४ हजार ९९१ मते मिळवत विजयी झाले. त्यांचे मताधिक्य होते ५८,४२७. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे जयंती भाई सिरोया यांना २६,५६४, तर मनसेच्या जुईली शेंडे यांना १८,४०६ मते मिळाली होती.
काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत विलेपार्ले क्षेत्रातून भाजपला (उज्ज्वल निकम) ९८ हजार ३४१ तर, काँग्रेसला (वर्षा गायकवाड) ४७ हजार १६ मते मिळाली होती. म्हणजेच येथून भाजपला ५१,३२५ इतके मताधिक्य होते. त्यामुळे भाजपसाठी सुरक्षित मानल्या जात असलेल्या विलेपार्ले मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी यावेळी पराग अळवणी यांच्याशिवाय भाजपचे इतर काही नेतेसुद्धा चाचपणी करीत होते. इतकेच नाही तर शिवसेना शिंदे गटातर्फे माजी आमदार डॉ. दीपक सावंत हे इथून लढण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटत असल्याची चर्चा सुद्धा सुरू होती. अखेर महायुतीच्या उमेदवारीची माळ अळवणी यांच्याच गळ्यात पडली.
महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाट्याला आली असून इथून माजी नगरसेवक संदीप राजू नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेतर्फे जुईली ओमकार शेंडे रिंगणात उतरल्या आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे संतोष अंबुलगे आणि आणखी दोन अपक्ष उमेदवार, असे एकूण सहा उमेदवार निवडणूक लढवत आहेत. प्रमुख लढत मात्र भाजपचे अळवणी आणि शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे संदीप नाईक यांच्यात होईल. ठाकरे सेनेला काँग्रेस आणि मित्रपक्षांची साथ कशी मिळेल, तसेच मनसेच्या शेंडे यांना कोणत्या वर्गातून आणि किती मतदान होते, यावर मुख्य लढतीचा रंग अवलंबून आहे, असे मानले जात आहे.
प्रमुख समस्या :
-विमानतळाच्या फनेल झोनमधील इमारतींचा पुनर्विकास.
-झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन.
-रस्त्यांची पावसाळ्यातली दुरवस्था.
-पश्चिम द्रुतगती मार्गालगत वाहतूककोंडी.
-अपुरा, दूषित पाणीपुरवठा.
-हवेचे प्रदूषण.
मतदार :
पुरुष : १ लाख ४२ हजार ६५५
महिला : १ लाख ३२ हजार ६७०
एकूण मतदार :
२ लाख ७५ हजार ३२५