पालिकेचे ६० हजार कर्मचारी निवडणूक सेवेत; अत्यावश्यक सेवांवर परिणाम नाही

Maharashtra assembly elections 2024 : विधानसभा निवडणुकीत बुधवारी होत असलेल्या मतदानाच्या व्यवस्थेसाठी मुंबई महापालिकेचे सुमारे ६० हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले असले तरी, यात आरोग्य आणि अग्निशमन दल या विभागांचे कर्मचारी घेतलेले नाहीत.
पालिकेचे ६० हजार कर्मचारी निवडणूक सेवेत; अत्यावश्यक सेवांवर परिणाम नाही
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुकीत बुधवारी होत असलेल्या मतदानाच्या व्यवस्थेसाठी मुंबई महापालिकेचे सुमारे ६० हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले असले तरी, यात आरोग्य आणि अग्निशमन दल या विभागांचे कर्मचारी घेतलेले नाहीत. तसेच इतर अत्यावश्यक विभागांतील जे कर्मचारी अत्यावश्यक कामासाठी गरजेचे नसतात, केवळ त्यांनाच निवडणुकीचे काम दिले आहे. त्यामुळे पालिकेच्या अत्यावश्यक सेवांवर विपरीत परिणाम होणार नाही, अशी माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सोमवारी दिली.

यावेळी प्रथमच पालिका आयुक्त हे मुंबई शहर आणि उपनगर या दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत. पालिकेतील अत्यावश्यक विभागातील कर्मचाऱ्यांनाही निवडणुकीचे काम देण्यात आले आहे. त्याबाबत गगराणी यांना पत्रकार परिषदेत विचारणा करण्यात आली. त्यावर ते म्हणाले की, “अत्यावश्यक सेवेच्या विभागात भरती केलेले सर्वच कर्मचारी ती अत्यावश्यक सेवा देत नसतात. उदाहरणार्थ त्या विभागातील लिपिक आदी कर्मचारी. अशाच कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम दिले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांवर काही परिणाम होणार नाही.”

पोलिस दलाचे २५ हजार ६९६ कर्मचारी आणि अधिकारी मुंबईत निवडणुकीच्या कामासाठी तैनात केले जात आहेत. असे एकूण १ लाख कर्मचारी-अधिकारी मुंबई शहर आणि उपनगरातील निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केले आहेत. मुंबईत मतदान केंद्रांवर शहरात ११ हजार ५८५, उपनगरात ३५ हजार २३१ असे एकूण ४६ हजार ८१६ कर्मचारी असतील. त्याशिवाय मतदान केंद्रांवरील सूक्ष्म निरीक्षक म्हणून शहरात ६३९ तर, उपनगरात १६०२ असे दोन हजार २४१ कर्मचारी असतील. प्रत्येक केंद्रावर किमान पाच पोलीस कर्मचारी असतील.

मोबाईल बंदी कायम

मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसात मोबाईल किंवा तत्सम साहित्य बाळगता येणार नाही. अनेक मतदार मोबाईल सोबत आणतात, हे निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिले आहे. पण त्यात सूट देण्यात काही कायदेशीर अडचणी आहेत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी कुणालाही मतदान केंद्रात मोबाईल न्यायला परवानगी मिळणार नाही, असे जिल्हा निवडणूक अधिकारी गगराणी यांनी स्पष्ट केले आहे.

तीन नियंत्रण कक्षांतून नजर

मतदान आणि मतमोजणीच्या कामावर नजर ठेवण्यासाठी निवडणूक आयोग, पोलीस आणि महापालिका यांचे निरीक्षण कक्ष असतील. या कक्षांमधून निवडणुकीच्या प्रक्रियेची प्रत्यक्ष त्यावेळची माहिती तत्काळ मिळत राहणार आहे. सर्व मतदार केंद्रांच्या ठिकाणी १०० टक्के बेव कास्टिंगची सुविधा असणार आहे. त्याशिवाय मतदार किंवा कर्मचारी यांना प्रकृतीची तक्रार निर्माण झाल्यास रुग्णवाहिका पाठविल्या जातील.

मुंबईत आतापर्यंत ३४७ कोटी २१ लाख जप्त

निवडणूक काळात आतापर्यंत मुंबई शहरात ३२ कोटी ९७ लाख, उपनगरात १२ कोटी ६० लाख अशी ४५ कोटी ५७ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. शहरात १३ लाखाचे मद्य तर उपनगरात एक कोटी १० लाख किमतीचे जप्त केले आहे. शहरात चार कोटी १७ लाखांचे अमली पदार्थ तर, उपनगरात ४४ कोटी ७९ लाख रुपये किमतीचे जप्त केले आहेत. जप्त केलेले मौल्यवान धातू शहरात सहा कोटी ९७ लाख तर, उपनगरात २३८ कोटी ६७ लाख मूल्याचे आहेत. मतदारांना वाटपासाठी आणलेल्या वस्तू शहरात दोन कोटी ६१ लाख रुपयांच्या, तर उपनगरात तीन कोटी २१ लाख रुपयांच्या ताब्यात घेण्यात आल्या. अशाप्रकारे मुंबईत रोख तसेच वस्तू मिळून आतापर्यंत ३४७ कोटी २१ लाखांची जप्ती करण्यात आली आहे.

आचारसंहिता भंग तक्रारी

आचारसंहिता भंगाबाबत सी व्हिजील ॲपद्वारे मुंबई उपनगरात ६१५ तर, शहरात ६२३ तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी शहरात ५६३ तर, उपनगरात ५६४ प्रकरणांत कारवाई करण्यात आली. शिवाय आचारसंहिता भंगाबाबत शहरात आठ तर, उपनगरात आठ गुन्हे दाखल झाले आहेत. कायदा सुव्यवस्थेसाठी एकूण ३० गुन्हे दाखल झाले आहेत.

मतदार यादीतून ४३ हजार २० नावे वगळली

मुंबईतील मतदार याद्यांतून दुबार किंवा अन्य आक्षेप या कारणाने एकूण ४३ हजार २० नावे वगळण्यात आली आहेत. यापैकी २६ हजार ४२९ नावे शहरातील, तर १६ हजार ५९१ नावे उपनगरातील आहेत.

६२७२ जणांचे गृह मतदान

मुंबईत शहरातील २१५४ आणि उपनगरातील ४११८ अशा ६२७२ नागरिकांनी गृह मतदान केले आहे, अशी माहिती गगराणी यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in