संजय भालेराव,राम कदम (डावीकडून)
संजय भालेराव,राम कदम (डावीकडून)

राम कदम यांचा चौथ्यांदा आमदारकीचा रथ रोखणार का? ठाकरे सेनेचे भालेराव यशस्वी होतील काय, याची उत्सुकता !

Maharashtra assembly elections 2024 : घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात २००९ मध्ये मनसेतर्फे, तर २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपतर्फे आमदार म्हणून निवडून आलेले राम कदम आता चौथ्यावेळी आमदारकीसाठी भाजपच्या तिकिटावर उभे आहेत. ते चौथ्यांदा आमदार होणार की, या वेळी ठाकरे सेनेचे संजय भालेराव त्यांचा विजयरथ रोखणार, याची उत्कंठा या मतदारसंघात आहे.
Published on

शिरीष पवार, मुंबई

घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात २००९ मध्ये मनसेतर्फे, तर २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपतर्फे आमदार म्हणून निवडून आलेले राम कदम आता चौथ्यावेळी आमदारकीसाठी भाजपच्या तिकिटावर उभे आहेत. ते चौथ्यांदा आमदार होणार की, या वेळी ठाकरे सेनेचे संजय भालेराव त्यांचा विजयरथ रोखणार, याची उत्कंठा या मतदारसंघात आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत २०१९ मध्ये भाजपचे राम कदम हे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार असताना २८ हजार ७८८ मताधिक्याने येथून निवडून आले होते. त्या वेळी शिवसेनेतून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार संजय भालेराव यांनी ४१ हजार ४७४ मते मिळवली होती. तेच भालेराव या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून कदम यांचा सामना करीत आहेत. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना भाजपचे मिहिर कोटेचा यांच्यापेक्षा घाटकोपर पश्चिमेत १५ हजार ७७२ मते जास्त पडली होती. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे भालेराव मित्रपक्षांच्या मदतीने कदम यांना कशी लढत देतात, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

दहीहंडी उत्सव, ज्येष्ठ नागरिकांसाठी देवदर्शन योजना आदी गोष्टींमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले राम कदम २००९ मध्ये येथून मनसेचे उमेदवार होते. त्यावेळी निकटच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या पूनम महाजन यांचा त्यांनी २६ हजार २२८ मतांच्या अधिक्याने पराभव केला होता. २०१४ मध्ये मात्र कदम भाजपचे उमेदवार होते. त्या वेळी ते ४१ हजार ९१६ इतक्या मताधिक्याने निवडून आले होते. त्या वेळी वेगळ्या लढलेल्या शिवसेनेचे सुधीर मोरे यांना ३८ हजार, तर मनसेच्या दिलीप लांडे यांना १७ हजार २०७ मते मिळाली होती. काँग्रेस चौथ्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस पाचव्या स्थानावर होते. या मतदारसंघात मराठी भाषिकांचे प्रमाण मोठे आहे. त्या तुलनेत गुजराती मतदार कमी आहेत. उत्तर भारतीयांची संख्याही लक्षणीय आहे. भाजप आणि ठाकरे सेना या दोन्ही बाजूने विकास आणि अस्मिता यांचे मुद्दे प्रचारात आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापासूनच दोन्ही बाजू शक्तिप्रदर्शन करीत आहेत.

मतदारांची संख्या

पुरुष - १.४७,८२३

महिला - १,२९,५८९

तृतीयपंथी - १२०

एकूण - २.७७.५३२

मतदारसंघातील प्रश्न

टेकड्यांवरील वसाहतींमध्ये पाणी चढत नाही.

सार्वजनिक स्वच्छतागृहांच कमतरता.

उद्याने, खेळाची मैदाने पुरेशा प्रमाणात नाहीत.

रस्ते, पदपथावरील अतिक्रमणे.

भीमनगर चौक, संघानी इस्टेट, सर्वोदय रुग्णालयाच्या रस्त्यांवर होणारी वाहतूककोंडी.

logo
marathi.freepressjournal.in