नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपप्रणीत सरकारला पाठिंबा दर्शवला. यावरून अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. हा मुद्दा आज विधानसभेतही चांगलाच गाजला. यावेळी आमदार गुलाबराव पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील टोला लगावताना, "शीशे के घरोंमे रहनेवाले दुसरों के घरोंपर पत्थर नहीं फेंका करते." असे म्हणत टोला लगावला.
आमदार गुलाबराव पाटील म्हणाले की, "या देशात, राज्यात बदलाचे वारे वाहायला लागले, अशी विधाने ऐकायला मिळत आहेत. नागालँडमध्ये राष्ट्रवादीकडून भाजपाच्या फक्त मुख्यमंत्र्याला पाठिंबा दिला. हेच आहेत का ते बदलाचे वारे? एकीकडे इकडे जातीयवादी सरकार म्हणून आरोप करायचे तर, दुसरीकडे मांडीला मांडी लावून बसायचे, असे चित्र निर्माण झाले आहे. आता '५० खोके, नागालँड ओके' असे काही झाले आहे का?" असा मुद्दा उपस्थित केला.
यावर विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, "गुलाबराव पाटलांना आम्ही अनेक वर्षांपासून ओळखतो. प्रत्येक गोष्टीत राजकारण करावे, असे नाही आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार, सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. चौकशी करा ना, ही कुठली पद्धत आहे? तुमच्याच हातात आहे ना? मग करा चौकशी. कारण नसताना कुणावरही कसलेही आरोप का करत आहात?" असा सवाल त्यांनी केला. तसेच, "नागालँडमधली परिस्थिती वेगळी असून तिथे सर्व पक्ष एकत्र मिळून सरकार स्थापन करतात अशी परंपरा आहे. भारतातला तो भाग भारतातच राहण्यासाठी भारतीय म्हणून निर्णय घेतला. त्याची चर्चा इथे करून गैरसमज पसरवण्याचे काहीच कारण नाही," असे स्पष्टीकरण दिले.
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "अजितदादा, गुलाबराव पाटलांनी नागालँडचा विषय काढला, तो आजचा विषय नव्हता खरंतर. पण जसे तुम्ही रोज येऊन खोके खोके करता, तुम्हीही ऐकायची सवय करा. जेव्हा आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो, तेव्हा बाकीचे बोटं आपल्याकडे असतात. नागालँडमध्ये पाठिंबा न मागताही तुम्ही दिला. त्याामुळे, शीशे के घरोंमे रहनेवाले दुसरों के घरोंपर पत्थर नहीं फेंका करते. सगळ्या गोष्टी प्रत्येकाकडे असतात. आम्ही बोलत नाही. पण समोरूनही रोज तुम्ही बोलत राहणार असाल, तर उत्तरही मिळणार" असे म्हणत त्यांनी अजित पवारांना इशारा दिला.