Sanjay Raut : संजय राऊतांच्या विधानावर अधिवेशनात गोंधळ; अजित पवार म्हणाले, त्यांना अधिकार नाही

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) महाराष्ट्र विधिमंडळाला म्हणाले 'चोरमंडळ'; सत्ताधारीच नव्हे तर विरोधकही म्हणाले हा अधिकार नाही
Sanjay Raut : संजय राऊतांच्या विधानावर अधिवेशनात गोंधळ; अजित पवार म्हणाले, त्यांना अधिकार नाही

आज तिसऱ्या दिवशी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर सत्ताधारीच नव्हे तर विरोधकांनीही आक्षेप नोंदवला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, " हे विधिमंडळ नव्हे तर चोरमंडळ आहे" असे वादग्रस्त विधान केले. याचे पडसाद आज सकाळी अधिवेशनातही पाहायला मिळाले. संजय राऊत यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि शिवसेना गटाचे आमदार आक्रमक झाले. तर, भाजप आमदार आशिष शेलार यांनी त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी अधिवेशनामध्ये फक्त सत्ताधारीच नव्हे तर, विरोधकांमधूनही संजय राऊतांवर कारवाई करण्याची सहमती दर्शवली. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, "आशिष शेलार यांच्या मताशी मी सहमत आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीला, नागरिकाला विधिमंडळाला चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार नाही. पक्षीय विचार बाजूला ठेवून या गोष्टीकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. या बातमेमध्ये तथ्य असेल तर याची शहानिशा करून विधिमंडळाने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे."

आमदार अतुल भातखळकर म्हणाले की,"खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानाबद्दल त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्यात यावी. हा सगळ्या विधिमंडळाचा अपमान आहे. या विधिमंडळाला एक उज्वल परंपरा आहे. स्वर्गीय माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवारांपर्यंत आपण अनेकजण याचे सदस्य आहोत, अशा विधिमंडळाला चोर म्हणतात? फक्त त्यांच्या जवळच्या माणसाला कोव्हिडच्या प्रकरणात अटक केली, त्याचा राग हे या विधिमंडळावर काढत आहेत का? माझी विनंती आहे की, आजच्या आज हे प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठवले पाहिजे आणि असे बोलणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे." त्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीदेखील संजय राऊतांच्या विधानावर आक्षेप नोंदवला.

logo
marathi.freepressjournal.in