'राहुल गांधी, माफी मागा' विधानसभेत आशिष शेलारांनी केली मागणी; सभागृहात गदारोळ

कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांना न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर हा मुद्दा विधानसभेतही चांगलाच गाजला, आशिष शेलारांनी केली काँग्रेसवर टीका
'राहुल गांधी, माफी मागा' विधानसभेत आशिष शेलारांनी केली मागणी; सभागृहात गदारोळ
Published on

आज सुरत सत्र न्यायालयाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यांना जामीनही मिळाला. मानहानीचा प्रकरणामध्ये त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. हा मुद्दा आज विधानसभेतही चांगलाच गाजला. आधी सत्ताधारी आमदारांनी राहुल गांधींविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा दिल्या. त्यांनतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी, 'राहुल गांधींनी जाहीर माफी मागावी' अशी मागणी केली. यावेळी आक्रमक झालेल्या आशिष शेलारांनी काँग्रेसवरदेखील टीका केली. तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरही त्यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली.

राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेचे पडसाद आज राज्याच्या विधानसभेतही उमटले. राहुल गांधींच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील विधानामुळे आज महाराष्ट्राच्या विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला. त्यांनी माफी मागावी, अशी मागणी सत्ताधारी आमदारांनी लावून धरली. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि भाजप आमदार आशिष शेलार यांनी विधासभेत चांगलाच गोंधळ घातला. यावेळी काँग्रेसकडूनही उत्तर देण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे विधानसभेत गदारोळ झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी हा गदारोळ रोखण्याचा प्रयत्न केला. पण, सत्ताधारी आमदार ना थांबल्याने अध्यक्षांना १० मिनिटांसाठी विधानसभा स्थगित करावी लागली.

भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले की, "स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. त्यांनी जाहीरपणे माफी मागावी," अशी मागणी त्यांनी केली. तसेच, राहुल गांधींविरोधात ठराव मांडण्याची परवानगीदेखील त्यांनी यावेळी अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे मागितली. यानंतर सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे विधानसभा दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in