आमदार म्हणून सत्यजित तांबेंचा पहिला दिवस; म्हणाले, "योग्य वेळ आल्यानंतर..."

नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणून आलेले अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांचा अधिवेशनाचा पहिलाच दिवस होता, यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर दिली उत्तरे
आमदार म्हणून सत्यजित तांबेंचा पहिला दिवस; म्हणाले, "योग्य वेळ आल्यानंतर..."

गेल्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने नाशिक पदवीधर मतदारसंघात झालेले राजकारण पाहिले. त्यानंतर या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून उभे राहिलेले सत्यजित तांबे हे निवडून आले. त्यानंतर आज आमदार म्हणून त्यांचा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस होता. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांच्यावर अनेक प्रश्नांचा भडीमार केला. त्यांना यावेळी त्यांच्या भावी वाटचालीबद्दल आणि भाजपने दिलेल्या ऑफरच्या बातमीबद्दल विचारण्यात आले.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, "मी अपक्ष आमदार आहे, आणि मी अपेक्षाच राहणार आहे. परिस्थितीनुसार जे प्रश्न समोर येतील, त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील. आज माझा पहिलाच दिवस आहे आणि तुम्ही माझ्यावर प्रश्नाचा भडीमार करत आहात. माझी भूमिका मी निश्चितपणे मांडेन मांडण्याचा प्रयत्न करेन. आज राज्यामध्ये अनेक प्रश्न असून तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक प्रश्न मला विधानसभेत मांडायचे आहेत."

सत्यजित तांबे यांना काँग्रेसकडून फोन आला होता का? आणि नाना पटोले किंवा पक्षश्रेष्ठींकडून मनधरणीसाठी काही संपर्क करण्यात आला होता का? असे विचारल्यानंतर सत्यजित तांबे म्हणाले की, "सगळ्यांचेच निरोप आणि सगळ्यांचेच आशीर्वाद आहेत. त्यांच्या आशीर्वादानेच मी इथपर्यंत पोहोचलो आहे. योग्य वेळ आली की म्ही माझ्या मनातले सांगेन," असे म्हणत थेट उत्तर देणे टाळले. त्यामुळे अनेक चर्चा होऊ लागल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in