

मुंबई : कर्करोगाचे वेळीच निदान करत रुग्णांना वेळीच उपचार द्यावेत, यासाठी कर्करोग रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवेचे मूल्यमापन करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करा, असे निर्देश आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
राज्यातील आरोग्यसेवा अधिक प्रभावी आणि दर्जेदार करण्यासाठी विभागामार्फत रचनात्मक कामांवर भर द्यावा, तसेच नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आरोग्य भवनात आरोग्य विभागाच्या विविध सेवांचा आढावा मंत्री आबिटकर यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत लसीकरण, कर्करोग निदान, सिकल सेल नियंत्रण, मानसिक आरोग्य, मधुमेह आणि उच्च रक्तदाब या विषयांवर चर्चा झाली.
बैठकीस आरोग्य सेवा आयुक्त कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक डॉ. सुनीता कोल्हाहित, सहसंचालक सांगळे, सहाय्यक संचालक दीप्ती पाटील देशमुख यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
विशेषतः लसीकरण, कर्करोग निदान व उपचार, तसेच सिकल सेल अनुवांशिक आजार नियंत्रणासाठी ठोस उपक्रम राबवावेत. या सेवांसाठी आवश्यक निधी नियोजनपूर्वक वितरित करावा. राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत देशभरात सुरू असलेल्या नवकल्पनांचा अभ्यास करून, महाराष्ट्रासाठी उपयुक्त योजना समाविष्ट कराव्यात. विभागाने तज्ज्ञांचे मत जाणून घेत नियोजन करावे, तसेच आरोग्यसेवा पुरवताना नागरिकांना अधिकाधिक सुविधा मिळतील याची काळजी घ्यावी, असे आबिटकर यांनी सांगितले.
आशा सेविकांचे मानधन वेळेत मिळावे, यासाठी काटेकोर पावले उचलावीत. विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच डीबीटी योजनेंतर्गत निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर वेळेत पोहोचावा, यासाठी प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात यावा. गरजेच्या वस्तूंचीच खरेदी सीएसआर माध्यमातून करावी, तसेच गरजू रुग्णांना आरोग्यसेवा पुरवण्यासाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा, यासाठी तरतूद करावी. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी, तसेच पॉलिएटिव्ह केअर कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
आरोग्यविषयी जनजागृतीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या!
मानसिक आरोग्य, आयूष सेवांचा विस्तार आणि आरोग्यविषयक जनजागृती या विषयांवर विशेष भर द्यावा. नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन नियोजन करावे, राज्यातील सर्व आरोग्य समन्वयकांच्या मासिक बैठका घेऊन कामाचे मूल्यमापन नियमितपणे करावे, विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग करून सेवांचा दर्जा उंचवावा, असे निर्देशही आबिटकर यांनी दिले.