
मुंबई : राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक येत्या पाच दिवसांत निवृत्त होणार आहेत. सौनिक यांचा उत्तराधिकारी कोण असेल? याची जोरदार चर्चा मंत्रालयात सुरू आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) राजेश कुमार, केंद्रीय समाजकल्याण खात्याचे सचिव राजेश अग्रवाल व गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल यांच्या नावाची मुख्य सचिव म्हणून जोरदार चर्चा सुरू आहे.
जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षाच्या कार्यकाळासाठी मुख्य सचिवांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आणि केंद्रीय समाजकल्याण खात्याचे सचिव राजेश अग्रवाल त्यांच्या मूळ राज्यात परत गेले, तर या पदासाठी तीव्र स्पर्धा होईल. त्यांच्या निवृत्तीनंतर, राज्याला दुसऱ्या महिला मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर मिळतील, ज्या सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. त्या मुख्य सचिव झाल्यास त्यांना अडीच वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ मिळू शकेल.
जर इक्बालसिंह चहल हे मुख्य सचिव झाल्यास त्यांना केवळ सात महिन्यांचा कालावधी मिळेल. ते जानेवारी २०२६ रोजी निवृत्त होतील. तर राजेश अग्रवाल हे विद्यमान मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यानंतर वरिष्ठ आहेत. अग्रवाल हे मुख्य सचिव झाल्यास ते ऑगस्टमध्ये म्हणजे अवघ्या दोन महिन्यांत निवृत्त होतील.
राजेश कुमार, इक्बालसिंह चहल यांच्यानंतर दिव्यांग कल्याण खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर हे राज्याच्या सेवेत आहेत. ते मे २०२६ रोजी निवृत्त होणार आहेत. तर मुंबई मनपाचे विद्यमान आयुक्त भूषण गगराणी हे मार्च २०२६ रोजी निवृत्त होतील, तर केंद्र सरकारच्या सेवेतील राजेश अग्रवाल यांनी दिल्लीत राहण्याचा निर्णय घेतल्यास ही शर्यत आणखी तीव्र होईल. इक्बालसिंह चहल यांच्यानंतर भूषण गगराणी हे सर्वोच्च पदावर दावा करू शकतात. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी २०१८ आणि १९ मध्ये मुख्यमंत्री कार्यालयात काम केले आहे. त्यांची कार्यशैली आणि मुख्यमंत्र्यांशी असलेली जवळीक त्यांना या पदाच्या जवळ नेऊ शकते, तर मनीषा पाटणकर-म्हैसकर या मार्च २०२९ मध्ये निवृत्त होणार आहेत. त्या वर्षी लोकसभा निवडणुका असल्याने त्यांना मुदतवाढही मिळू शकते. मुदतवाढीसाठी राज्य सरकारने
केंद्र सरकारकडे कारण देणे गरजेचे असते. मध्यावधी निवडणूक किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यास मुदतवाढ दिली जाऊ शकते.