

मुंबई : आखाती युद्धामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकीकडे देशवासीयांना काटकसरीचे आवाहन केले असताना, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी शाही खानपान सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी दरवर्षी ९ कोटी ८५ लाख रुपये सरकारी तिजोरीतून खर्च केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी येणाऱ्या अभ्यागतांचे, अतिथींचे आदरातिथ्य करण्यासाठी सुखसागर हॉस्पिटॅलिटी सर्विसेस या सेवा पुरवठादाराची निवड झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.
कंत्राटाचा कालावधी २० जुलै २०२६ ते १९ जुलै २०३० असा आहे. त्यामुळे पुढील चार वर्षात सरकारी तिजोरीवर ३९ कोटी ४० लाख रुपयांचा भार पडणार आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शासकीय बंगल्यावर येणाऱ्यांना बटाटेवडा, पंजाबी सामोसा, पट्टी समोसा, कचोरी कोथिंबिर वडी, मिसळ, पावभाजी, मटण बिर्याणी, चिकन बिर्याणी, ड्रायफ्रूटस, मोदक, उकडीचे मोदक, काजू मोदक असा खास बेत असणार आहे.
व्हीव्हीआयपींना ‘शाही दावत’
अतिमहत्त्वाच्या अर्थात व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी व्यक्तींसाठी लंच, डिनरची शाही दावत दिली जाईल. त्यासाठी व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी स्पेशल बुफे लंच आणि डिनरची ५२० रुपयांची नवीनच डिश सुरू केली आहे. व्हीव्हीआयपी-व्हीआयपी मांसाहारी लंच आणि डिनर ६२० रुपयांच्या दराने उपलब्ध करून दिले आहे. व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी मंडळींसाठी शाकाहारी-मांसाहारी लंच आणि डिनरचा दर ७२० रुपये आहे.
वाढत्या महागाईची झळ
दरम्यान, वाढत्या महागाईची झळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या खानपान सेवेला बसली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी चहा, कॉफी आणि इतर पदार्थांचे दर वाढले आहेत.