महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शासनाकडून हुतात्म्यांच्या बलिदानाचा अपमान; हुतात्मा स्मारकावर सुशोभीकरण केले नसल्याचा मराठी अभ्यास केंद्राचा आरोप

मराठी राज्यासाठी या वीरांनी प्राणाची आहुती दिली, त्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकावर महानगरपालिका वा राज्य सरकारकडून साधे सुशोभीकरणही केले गेले नव्हते.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शासनाकडून हुतात्म्यांच्या बलिदानाचा अपमान; हुतात्मा स्मारकावर सुशोभीकरण केले नसल्याचा मराठी अभ्यास केंद्राचा आरोप
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शासनाकडून हुतात्म्यांच्या बलिदानाचा अपमान; हुतात्मा स्मारकावर सुशोभीकरण केले नसल्याचा मराठी अभ्यास केंद्राचा आरोप(Photo-X/@TawdeRitu)
Published on

मुंबई : मराठी राज्यासाठी या वीरांनी प्राणाची आहुती दिली, त्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकावर महानगरपालिका वा राज्य सरकारकडून साधे सुशोभीकरणही केले गेले नव्हते. महाराष्ट्राच्या स्थापनेचा सुवर्णदिन साजरा करताना ज्यांच्या बलिदानामुळे हे राज्य अस्तित्वात आले, त्यांच्याच स्मृतींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले असून हा हुतात्म्यांचा अपमान असल्याचा आरोप मराठी अभ्यास केंद्राने केला आहे.

महाराष्ट्र दिनी मराठी अभ्यास केंद्राच्या सदिच्छादूत चिन्मयी सुमित आणि अनेक कार्यकर्त्यांनी हुतात्मा चौक येथे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०७ हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. यावेळी सरकारच्या वतीने स्मारकाचे कोणतेही सुशोभीकरण केले नसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. फुले, रांगोळी, विशेष प्रकाशयोजना आणि मंडप अशी कोणतीही सजावट करण्यात आली नव्हती. त्याचप्रमाणे प्रशासनाच्या वतीने कोणतीही अधिकृत व्यवस्था केली नसल्याने मराठीप्रेमी नागरिकांना व्यवस्थेच्या अभावामुळे चेंगराचेंगरीसारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागले असते, असा आरोपही मराठी अभ्यास केंद्राने केला आहे. मराठी अभ्यास केंद्राचे कार्यवाह आनंद भंडारे, मराठी शाळांच्या सदिच्छादूत चिन्मयी सुमित आणि अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली.

मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार सण, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी लाखो रुपये खर्च करते. महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पात हुतात्मा स्मारकाच्या देखभाल व सुशोभीकरणासाठी नेमकी किती तरतूद आहे, हे सरकारने जाहीर करावे, असे आव्हान मराठी अभ्यास केंद्राने केले आहे.

मराठी अभ्यास केंद्राच्या ठोस मागण्या

  • हुतात्मा चौकाच्या सुशोभीकरण आणि देखभालीसाठी स्वतंत्र वार्षिक अर्थसंकल्पीय तरतूद जाहीर करावी.

  • हुतात्मा स्मारकाच्या देखभालीसाठी जबाबदार सरकारी विभाग आणि अधिकारी यांची नावे जाहीर करावी.

  • हुतात्म्यांची नावे, त्यांचे जिल्हे, बलिदानाच्या तारखा आणि परिस्थिती यांचा समावेश असलेली माहिती फलक स्मारकावर लावण्यात यावी.

  • संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि हुतात्म्यांच्या बलिदानाचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात ठळकपणे समाविष्ट करावा.

logo
marathi.freepressjournal.in