
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज आर्थिक पाहणी अहवाल सादर केला आहे. यामध्ये राज्याच्या आर्थिक विकास दरात ६.८ टक्क्यांची तर उद्योगात ६.१ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. तर कृषी आणि संलग्न कार्येक्षेत्रात १०.२ टक्क्यांची वाढ होणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला.
उद्या अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आपल्या कारकिर्दीतला पहिला अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पात काय असणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, त्यापूर्वी त्यांनी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. यामध्ये त्यांनी केलेल्या आर्थिक सर्वेक्षणातील महत्वाचे मुद्दे विधिमंडळात मांडले. ३१ मार्चला संपणाऱ्या २०२२-२३ या आर्थिक वर्षात महाराष्ट्राचा विकास दर ६.८ टक्के आणि देशाचा विकास दर ७ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. तर, २०२२-२३च्या पुर्वानुमानानुसार दरडोई राज्य उत्पन्न २.४२ लाख रुपये अपेक्षित असून २०२१-२२मध्ये ते २.१५ लाख रुपये होते.
यंदा २०२२-२३च्या रब्बी हंगामात ५७.७४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. मागील वर्षाच्या तुलनेत कडधान्य उत्पादनात ३४ टक्के वाढ होईल असा अंदाजव्यक्त करण्यात आला. तसेच, तृणधान्ये, तेलबियांच्या उत्पादनात प्रत्येकी १३ टक्के घट धरण्यात आली असून या अहवालात यंदा राज्याचे स्थूल उत्पन्न ३५ लाख २७ हजार ८४ कोटी अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील शहरी बेरोजगारीचा दर २०१८-१९मध्ये ६.३ टक्के होता, जो २०२०-२१मध्ये वाढून ६.५ टक्क्यांपर्यंत झाला. पण ग्रामीण बेरोजगारीचा दर ४.२ टक्के होता, तो २.२ टक्क्यांवर आला.