मुंबई : महायुतीचे उमेदवार म्हणून सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना माहीम विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. कोणाचाही दबाव आला तरी आता माघार नाही, अशी भूमिका एकनाथ शिंदे शिवसेनेचे माहीम विधानसभा मतदार संघातील उमेदवार सदा सरवणकर यांनी दैनिक ‘नवशक्ति’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत, महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर आणि मनसे नेते अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने माहीम मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांना उमेदवारीसाठी प्राधान्य दिले जाते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीम मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत यांना महायुतीचे उमेदवार म्हणून सदा सरवणकर यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यानंतर माहीम मतदार संघात कोण बाजी मारणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला. शेलार यांच्या भूमिकेनंतर महायुतीला तडा गेला आणि सदा सरवणकर यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर सुरू झाला, अशी शिंदेंच्या शिवसेनेत चर्चा सुरू झाली. त्यानंतर सदा सरवणकर यांना उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू झाले. मात्र सदा सरवणकर निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीसाठी महायुती, मविआकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. उमेदवारी जाहीर केल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले. मनसेचे नेते अमित ठाकरे माहीम मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सोमवारी अमित ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेत निवडणूक अर्ज दाखल केला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवणे ही दोन्ही शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची लढाई आहे.
दबाव आला तरी आता माघार नाही - सदा सरवणकर
३० वर्षांहून अधिक काळ माहीम दादर मतदार संघात नेतृत्व करत आलो असून मतदारांनी कामाची पोचपावती दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणाचाही दबाव आला तरी उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याचे सदा सरवणकर यांनी सांगितले. आपण मंगळवारीच उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही सरवणकर यांनी स्पष्ट केले.