मुंबई : मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांत यंदा चुरशीच्या लढती होणार असल्याचे दिसते. वडाळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर हे आतापर्यंत ८ वेळा विजयी झाले आहेत. २०२४ च्या त्यांच्या निवडणुकीत गळ्यात विजयाची माळ पडली तर त्यांच्या विजयाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील पेपर सोपा असेल अशी चिन्हे दिसत नाहीत.
वडाळा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून कालिदास कोळंबकर, ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी महापौर श्रद्धा जाधव आणि मनसेकडून माजी नगरसेविका स्नेहल जाधव रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे विधानसभा मतदारसंघात कमळ फुलणार?, मशाल धगधगणार? की मनसेचे इंजिन धावणार ? हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईलच.
आता नाही तर पुन्हा नाही, यंदाची विधानसभा निवडणूक सगळ्याच पक्षांसाठी अटीतटीची आहे. त्यामुळे निवडणूक जिंकणे हाच अजेंडा सगळ्याच पक्षांचा आहे. त्यामुळे आपला उमेदवार विजयी व्हावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अनेक मतदारसंघांत तेथील उमेदवाराचे काम त्याला विजयी करण्यात उपयुक्त ठरत असते. वडाळा विधानसभा मतदारसंघात कालिदास कोळंबकर हे आतापर्यंत आठ वेळा निवडून आले आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी मतदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. विद्यमान आमदार असले तरी निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार माजी महापौर श्रद्धा जाधव यांचीही वडाळा विधानसभा मतदारसंघात मतदारांमध्ये चांगली पकड आहे. मनसेच्या उमेदवार स्नेहल जाधव या माहीम मतदारसंघातील असून त्यांना वडाळा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे स्नेहल जाधव यांचा मतदारांवर किती प्रभाव पडेल हे २० नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईलच. तरी कोणत्या उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ घालायची हा सर्वश्री अधिकार मतदार राजाचा. त्यामुळे आपला आमदार कोण? हे मतदारांचा कौल ठरविणार आहे.
पुरुष - १ लाख ५ हजार ३७२
महिला- ९९ हजार ५५३
एकूण- २ लाख ४ हजार ९२७