अभियांत्रिकी प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; ९८ हजार ५५ विद्यार्थ्यांना प्रवेश

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची तिसरी गुणवत्ता यादी गुरुवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली.
अभियांत्रिकी प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; ९८ हजार ५५ विद्यार्थ्यांना प्रवेश
Published on

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची तिसरी गुणवत्ता यादी गुरुवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. यामध्ये पसंतीक्रम भरलेल्या १ लाख १९ हजार २३ विद्यार्थ्यांपैकी ९८ हजार ५५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. यापूर्वी राबविण्यात आलेल्या दोन फेऱ्यांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याने तिसऱ्या यादीत प्रवेश मिळालेले किती विद्यार्थी प्रवेश घेणार याकडे सीईटी सेलचे लक्ष लागले आहे.

पहिल्या दोन याद्यांमध्ये १ लाख ८३ हजार जागांपैकी ६४ हजार ८४१ जागांवर प्रवेश झाले. गुरुवारी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून तिसऱ्या यादीसाठी १ लाख १९ हजार २३ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरला होता. पसंतीक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९८ हजार ५५ विद्यार्थ्यांना जागा जाहीर झाल्या आहेत. यामध्ये पहिल्या सहा पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ९ हजार ७०६ इतकी आहे. या यादीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना २२ ते २५ ऑगस्टदरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.

पहिल्या दोन फेऱ्यांना अल्प प्रतिसाद

अभियांत्रिकीच्या पहिल्या यादीत १ लाख ४४ हजार ७७६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. मात्र फक्त ३४ हजार ९३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्याचप्रमाणे दुसऱ्या फेरीमध्ये १ लाख ६२ हजार २०५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. यातील फक्त २९ हजार ९१० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश घेतला. दोन्ही फेऱ्यांमध्ये ६४ हजार ८४१ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतल्याने पहिल्या दोन फेऱ्यांना विद्यार्थ्यांनी अल्प प्रतिसाद दिला.

logo
marathi.freepressjournal.in