सुट्या दुधाची ‘ऑन द स्पाॅट’ तपासणी; भेसळयुक्त दूध आढळले तर मालकावर थेट कारवाई, एफडीएच्या ताफ्यात अद्ययावत मिल्को स्क्रीन मशीन

बाजारात विशेषतः ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुट्या दुधाची विक्री होते. मात्र यापुढे सुट्या दुधाची ‘ऑन द स्पॉट’ तपासणी होणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताफ्यात अद्ययावत ‘मिल्को स्क्रीन मशीन’ दाखल होणार आहेत.
सुट्या दुधाची ‘ऑन द स्पाॅट’ तपासणी; भेसळयुक्त दूध आढळले तर मालकावर थेट कारवाई, एफडीएच्या ताफ्यात अद्ययावत मिल्को स्क्रीन मशीन
AI वापरुन तयार केलेला फोटो
Published on

मुंबई : बाजारात विशेषतः ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुट्या दुधाची विक्री होते. मात्र यापुढे सुट्या दुधाची ‘ऑन द स्पॉट’ तपासणी होणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताफ्यात अद्ययावत ‘मिल्को स्क्रीन मशीन’ दाखल होणार आहेत. या मशीनच्या माध्यमातून सुट्या दुधात भेसळ केली आहे का, हे काही मिनिटांत उघडकीस येणार आहे. सुट्या दुधात भेसळ असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला.

राज्यातील जनतेला शुद्ध दूध मिळावे यासाठी राज्य सरकार सतत प्रयत्नशील आहे. नामांकित कंपन्या पिशवीतील दुधाची विक्री करतात. परंतु कंपनीतून आलेले दूध ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत त्यात भेसळ झाल्याचे एफडीएने केलेल्या कारवाईतून अनेकदा समोर आले आहे. पिशवीतील दुधाची जकात नाका, दुकानात जाऊन तपासणी करण्यात येते. भेसळयुक्त दूध असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येते. परंतु आजही सुट्या दुधाची विक्री होते. विशेष ग्रामीण भागात सुट्या दुधाची विक्री सर्रास होते. मात्र सुट्या दुधात भेसळ केली आहे की नाही? हे तपासण्याची कुठलीच यंत्रणा अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नाही. त्यामुळे सुट्या दुधात भेसळ होत असल्यास ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे सुट्या दुधाची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी दुधाची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेत सँपल पाठवले जात होते. परंतु मिल्को स्क्रीन मशीनमुळे दुधात भेसळ केली आहे की नाही हे काही मिनिटांत उघडकीस येते. ऑन द स्पॉट रिझल्ट मिळाल्यास संबंधित मालकावर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला.

दरम्यान सणांच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त दुधाची विक्री रोखण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठीच सुट्या दुधाची तपासणीही केली जाणार आहे.

१५९ फूड निरीक्षकांची करणार भरती

अन्न व औषध प्रशासन विभागात मनुष्यबळाचा अभाव असल्याने योग्य प्रकारे कारवाई होत नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागात १५९ फूड निरीक्षकांची भरती करण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.

स्ट्रीट फूडला मिळणार स्टार

मुंबईच्या रस्त्यांवर गल्लोगल्ली स्ट्रीट फूड स्टॉल असून अनेकजण या स्ट्रीट फूडचा आस्वाद घेत असतात. परंतु त्यांना मिळणारे स्ट्रीट फूड उत्तम दर्जाचे आहे की नाही याची तपासणी योग्य प्रकारे होत नाही. लोकांच्या आरोग्याची काळजी घेत स्ट्रीट फूडची तपासणी करण्यात येणार असून उत्तम दर्जाचे स्ट्रीट फूड असल्यास त्या विक्रेत्याला स्टार देण्यात येणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in