सोन्याच्या मिठाईचा ‘कस’; ग्राहकांच्या सुरक्षेसाठी प्रयोगशाळेत तपासणीचा FDA चा निर्णय

सोन्याचा मुलामा दिलेली मिठाई किलोला २४ हजार रुपये दराने विकली जात असल्याचा प्रकार अमरावतीमध्ये उघडकीस आला आहे.
सोन्याच्या मिठाईचा ‘कस’; ग्राहकांच्या सुरक्षेसाठी प्रयोगशाळेत तपासणीचा FDA चा निर्णय
सोन्याच्या मिठाईचा ‘कस’; ग्राहकांच्या सुरक्षेसाठी प्रयोगशाळेत तपासणीचा FDA चा निर्णय
Published on: 

मुंबई : सोन्याचा मुलामा दिलेली मिठाई किलोला २४ हजार रुपये दराने विकली जात असल्याचा प्रकार अमरावतीमध्ये उघडकीस आला आहे. या मिठाईमध्ये खरोखरच शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला आहे की केवळ सोन्याचा मुलामा दिल्याचे भासवून ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) संबंधित मिठाईचा नमुना तपासणीसाठी घेतला आहे. हा नमुना प्रयोगशाळेत पाठवण्यात आला असून, सोन्याचा मुलामा अशुद्ध किंवा बनावट असल्याचे आढळल्यास विक्रेत्याविरोधात कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

अमरावती येथील एका दुकानात सोन्याचा मुलामा दिलेली मिठाई किलोला २४ हजार रुपयांनी विकली जात असल्याची माहिती मुंढे यांना मिळाली होती. मिठाईच्या जास्त किमतीमुळे त्यामध्ये प्रत्यक्षात सोने वापरण्यात आले आहे की केवळ सोन्याचा मुलामा दिल्याचा दावा केला जात आहे, याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली. त्यानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी संबंधित दुकानातून मिठाईचा नमुना घेऊन तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला.

महागड्या मिठाईची खरेदी करताना ग्राहकांनी अधिक सावध राहावे, असे आवाहन मुंढे यांनी केले आहे. विक्रेत्यांच्या दाव्यांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. सामान्य मिठाईच्या तुलनेत कितीतरी जास्त किंमत आकारली जात असल्यास उत्पादनाच्या दर्जाबाबत खात्री करून घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चांदीचा वर्ख ओळखण्याची एक सोपी पद्धतही मुंढे यांनी सांगितली. सजावटीसाठी वापरण्यात आलेल्या वर्खाचा थोडासा भाग बोटांवर घेऊन चोळावा. अस्सल चांदीचा वर्ख सामान्य धातूच्या वर्खाप्रमाणे वागत नाही, तर ॲॅल्युमिनियमचा वर्ख चोळल्यास त्याचे लहान तुकडे होऊ शकतात असे मुंढे म्हणाले.

६३.४५ कोटींचा अन्नसाठा जप्त

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर अन्नपदार्थांच्या तपासणीची मोहीम तीव्र केली आहे. १ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील ९ हजार ६६६ हून अधिक अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत ६३.४५ कोटी रुपये किमतीचा ३ हजार ९८ मेट्रिक टन अन्नसाठा जप्त करण्यात आला. तसेच ९५४ परवाने निलंबित, तर २५ परवाने रद्द करण्यात आले.१५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात आलेल्या मोहिमेत ३ ३३२ आस्थापनांची तपासणी केली. १५०० हून अधिक सुधारणा नोटिसा बजावल्या. ३२६ परवाने निलंबित, तर १५ परवाने रद्द करण्यात आले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)