१ एप्रिलपासून महाराष्ट्र निर्बंधमुक्त आपत्ती व्यवस्थापन कायदा मागे, साथरोग नियंत्रण कायदा जैसे थे मास्क सक्ती नाही;

१ एप्रिलपासून महाराष्ट्र निर्बंधमुक्त 
आपत्ती व्यवस्थापन कायदा मागे, साथरोग नियंत्रण कायदा जैसे थे
मास्क सक्ती नाही;

गेल्या काही दिवसांतील कोरोना रुग्णांची घटती रुग्णसंख्या विचारात घेता कोविडसंदर्भात लागू केलेले निर्बंध पूर्णतः उठविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, येत्या १ एप्रिलपासून महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त होणार आहे. राज्याच्या कोविड व्यवस्थापनासाठी असलेल्या राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये मंगळवारी याबाबत निर्णय घेण्यात आला असून, बुधवारी (ता. ३०) दुपारपर्यंत याबाबत अधिकृत परिपत्रक जारी करण्यात येण्याची शक्यता आहे.

गेली दोन वर्षे कोविडच्या प्रसारामुळे विविध प्रकारचे निर्बंध राज्यातील जनतेवर लावण्यात आलेले आहेत. कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यानंतर वेगाने लसीकरण करण्यात येऊन बहुसंख्य लोकांनी लस घेतल्याने कोरोनाचा धोका टळला आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांत कोरोना संक्रमणाचे प्रमाणही बऱ्याच प्रमाणात खाली आहे. मृत्युदर तर शून्यावर आला आहे. त्यामुळे निर्बंध हटविण्याच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. गेली दोन वर्षे विविध निर्बंधांना जनताही आता कंटाळली असून, अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम दिसून येत आहे.

कोरोना साथीदरम्यान राज्यात लागू करण्यात आलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे जनतेवर लावण्यात आलेले निर्बंधही हटणार आहेत. त्यामुळे मास्क वापरणे आता बंधनकारक राहणार नाही; मात्र जनतेने मास्क वापरणे गरजेचे असल्याने तसे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच याबाबत जनजागृतीही करण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा मागे घेतल्याने कोविड निर्बंध न पाळल्याने होणारे दंडही पोलीस अथवा स्थानिक प्रशासन आकारू शकणार नाही; मात्र कोरोना अद्याप पूर्णतः हद्दपार न झाल्याने गर्दीत जाणे टाळणे किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरणे गरजेचे असल्याचे या बैठकीत नमूद करण्यात आले.

रेल्वे प्रवासासाठी किंवा मॉलप्रवेशासाठी पूर्णतः लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे आहे; मात्र आपत्ती व्यवस्थापन कायदा मागे घेतल्यानंतर हे बंधनही हटविण्यात येणार आहे; मात्र लसीकरण १०० टक्के करण्याबाबत सरकरचा प्रयत्न राहणार आहे.

सध्या राज्यात लसीकरणाचा वेग चांगला आहे, त्याचबरोबर प्रमाणही समाधानकारक आहे; मात्र तरीही राज्यातील अंदाजे ९० लाख ते एक कोटी लोकांनी अद्याप लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. त्यामुळे या लोकांनी दुसरा डोस घेण्याबाबत आवाहन आणि जनजागृती करण्यात येणार आहे. जनतेच्या मनातील कोरोनाची भीतीही आता कमी होत असल्याने अनेकांनी मास्क वापरणेही बंद केले आहे. त्यातच रुग्णसंख्या कमी होत असल्याने, तसेच लस घेतल्याने कोरोनाचा प्रसारही कमी होत चालला आहे.

असे असले, तरी मास्क वापरणे जनतेच्या हितासाठी गरजेचे असून त्यासाठी सक्ती नसली, तरी वापरणे गरजेचे असल्याने त्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे.

बॉक्स

जनतेला मिळणार दिलासा

* मास्क न वापरल्यास होणारा दंड बंद

* व्यापारी आस्थापनांवरील बंधने - दंड बंद

*रेल्वे प्रवासासाठी लसीकरणाची अट मागे

*मॉल आणि सिनेमागृहे प्रवेशासाठी लसीकरणाची अट मागे

* जनतेने स्वतःहून निर्बंध पाळण्याचे आवाहन

Related Stories

No stories found.