मुंबई : राज्य शासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता बॉम्बे रुग्णालयात आरोग्यविषयक चाचण्या करण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत असलेले ४० ते ५० वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षांतून एकदा व ५१ व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणीसाठी ५ हजार रुपये अदा करण्यात येतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रुग्णालयात आरोग्य विषयक चाचण्या करण्यास मान्यता दिली आहे. मात्र काही चाचण्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध नसल्यास चाचण्या बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. बॉम्बे रुग्णालयात चाचण्या करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून याबाबत बुधवारी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
...म्हणून खासगी रुग्णालयात चाचणी
राज्य शासनाच्या विविध विभागांत लाखो अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी राज्य सरकार घेत असते. त्यामुळे सेवाज्येष्ठतेनुसार त्यांना आरोग्यविषयक चाचण्या करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो. परंतु शासकीय रुग्णालयात सगळ्याच चाचण्या होत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे बॉम्बे हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात चाचणी करण्यास मंजुरी दिल्याचे राज्य सरकारच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.