मुंबई : राज्यात सोनोग्राफी आणि आयव्हीएफ केंद्रांद्वारे होणारे गैरप्रकार तसेच गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन रोखण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
या पथकांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रांच्या तपासणीची धडक मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
राज्यात विनापरवाना सुरू असलेल्या आयव्हीएफ केंद्रांवरील कारवाईबाबत समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना आबिटकर यांनी राज्यात आयव्हीएफ उपचार आणि सिझेरियन प्रसुतीचे प्रमाण अनावश्यकरित्या वाढत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे सांगितले.
त्यामुळे आयव्हीएफ उपचारांचा वापर केवळ वैद्यकीय गरजेनुसारच होण्यासाठी आवश्यक नियमावली तयार करण्यात येणार आहे. अशा प्रकारांमध्ये सहभागी असलेल्या डॉक्टरांसह संबंधित कर्मचारी आणि रुग्णालय व्यवस्थापनावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आबिटकर यांनी दिली.
बदलापूर, अंबरनाथमध्ये डॉक्टरांना अटक
बदलापूर आणि अंबरनाथ येथे उघडकीस आलेल्या स्त्रीबीज तस्करी प्रकरणात संबंधित डॉक्टरांना अटक करण्यात आली असून, त्यांची वैद्यकीय नोंदणी (सनद) रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यापुढेही अशा गैरप्रकारात सहभागी आढळणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.