

मुंबई : बौद्धगया येथे महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार असून बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्यासन स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. समतेचा, सामाजिक न्यायाचा आणि संविधानिक मूल्यांचा पुनरुच्चार करत भेदभावमुक्त समाज घडविण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महाडचा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता, असेही ते म्हणाले. चवदार तळ्याचे जलशुद्धीकरण आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी ५५ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चवदार तळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून मानवंदना देण्यात आली.
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, खासदार सुनील तटकरे आदी उपस्थित होते.
चवदार तळ्याचा संघर्ष केवळ पाणी पिण्यासाठी नव्हता, तर विषमता आणि अस्पृश्यतेच्या व्यवस्थेविरुद्ध उभारलेला मानवतेचा लढा होता. या सत्याग्रहामुळे देशातील सर्व सार्वजनिक पाणवठे सर्वांसाठी खुले झाले आणि समतेची पायाभरणी झाली. पुढील पिढीपर्यंत हा संघर्षाचा इतिहास पोहोचविण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर भव्य 'भीमसृष्टी' स्मारक उभारावी अशी सूचना रामदास आठवले यांनी यावेळी केली. या ऐतिहासिक स्थळाचा जागतिक दर्जाचा विकास करण्यावर भर देण्यात येत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
शासकीय सेवेत नियुक्त्या
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील वारसांपैकी ९८ जणांना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय सेवेत नियुक्तीचे आदेश वितरण करण्यात आले.