

मुंबई : मुंबई आणि महानगर क्षेत्रातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन, पुढील ५० वर्षांच्या पाणी नियोजनासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीनंतर समुद्रात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी मुंबईकडे वळवण्याचा प्रस्ताव एका उच्चस्तरीय बैठकीत मांडण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबईकरांना दरवर्षी तब्बल ६७ टीएमसी नवीन आणि शुद्ध पिण्याचा पाणीसाठा उपलब्ध होणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी सुरू असलेले प्रकल्प आणि नवीन पर्यायांवर सविस्तर चर्चा झाली. चिपळूण तालुक्यातील पोफळी येथील जलविद्युत प्रकल्पात वीजनिर्मिती झाल्यानंतर बाहेर पडणारे पाणी सध्या वाशिष्ठी नदीद्वारे थेट समुद्रात जाऊन मिळते. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोणताही औद्योगिक प्रकल्प किंवा एमआयडीसी नसल्याने, हे पाणी महाराष्ट्रातील सर्वात शुद्ध पाणी मानले जाते.
पाईपलाईनद्वारे पाणी पोहोचविण्याचा आढावा
समुद्रात वाया जाणारे हे शुद्ध पाणी भुयारी बोगदे आणि पाईपलाईनच्या माध्यमातून मुंबईपर्यंत आणण्याच्या तांत्रिक शक्यतेचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. सध्या मुंबईला विविध धरणांतून पाणीपुरवठा होत असला, तरी भविष्यातील वाढती गरज भागवण्यासाठी नव्या जलस्त्रोताची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे हा मार्ग व्यवहार्य ठरल्यास शहराच्या पाणीसाठ्यात मोठी भर पडणार आहे.
मुंबईकरांना ६७ टीएमसी पाणी मिळणार
हा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास मुंबईकरांना दरवर्षी ६७ टीएमसी शुद्ध पाणी मिळेल, ज्यामुळे शहराच्या पाणीटंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो. प्रकल्पाच्या तांत्रिक आणि आर्थिक बाबींचा सखोल अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाणार असून, मुंबईच्या दीर्घकालीन जलसुरक्षिततेसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.