आजचा विकास उद्याचा धोका ठरू नये! ‘बांबू अर्थव्यवस्था व शाश्वतता परिषदे’त राज्यपालांचे आवाहन

आजचा विकास उद्याचा धोका ठरू नये, अशा विकासाचा मार्ग स्वीकारण्याची गरज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी रविवारी व्यक्त केली.
आजचा विकास उद्याचा धोका ठरू नये! ‘बांबू अर्थव्यवस्था व शाश्वतता परिषदे’त राज्यपालांचे आवाहन
आजचा विकास उद्याचा धोका ठरू नये! ‘बांबू अर्थव्यवस्था व शाश्वतता परिषदे’त राज्यपालांचे आवाहन (Photo-X)
Published on: 

मुंबई : आजचा विकास उद्याचा धोका ठरू नये, अशा विकासाचा मार्ग स्वीकारण्याची गरज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी रविवारी व्यक्त केली. प्लास्टिक आणि लाकडाला शाश्वत पर्याय म्हणून त्यांनी बांबूचा पुरस्कार केला. ग्रामीण उपजीविका, रोजगार आणि हवामान कृतीला बांबूमुळे चालना मिळू शकते. हवामान बदलाशी लढण्याची ताकद असलेली बांबू ही निसर्गाची देणगी आहे, असे राज्यपाल म्हणाले.

पवई लेक परिसरातील द वेस्टिन येथे 'बांबू अर्थव्यवस्था व शाश्वतता परिषद-२०२६' आयोजित करण्यात आली होती. परिषदेच्या उद्घाटनपर भाषणात ते म्हणाले, 'आजचा विकास उद्याचा धोका ठरता कामा नये.' ही परिषद जागतिक बांबू दिनाच्या निमित्ताने घेण्यात आली. द फिनिक्स फाऊंडेशन, टेफ्लाज आणि मित्रा यांनी संयुक्तपणे तिचे आयोजन केले होते. बांबू मूल्य साखळीतील प्रत्येक घटक या निमित्ताने एका छताखाली आला. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरयाणा, उत्तराखंड, दिल्ली आणि आसामसह एकूण १३ राज्यांतून शेतकरी व शेतकरी नेते आले होते. धोरणकर्ते, उद्योगपती, उद्योजक, संशोधक, कारागीर, बांबू प्रक्रिया उद्योजक आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातील प्रतिनिधीही परिषदेत सहभागी झाले. यावेळी फलोत्पादन, रोजगार हमी योजना आणि खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले, गुजरातचे माजी मंत्री भूपेंद्रसिंह चुडासमा, केपी ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. फारुक पटेल, मौलाना हुजैफा वस्तान, वीटेफ्लाजचे व्यवस्थापकीय संचालक आदिल सिंह, परिषदेचे प्रेरणास्थान आणि 'बांबू मॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाणारे पाशा पटेल आदी उपस्थित होते. ते महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. राज्यपाल म्हणाले, 'बांबूवर अधिक संशोधन, अधिक जनजागृती आणि व्यापक व्यापारीकरण ही काळाची गरज आहे. म्हणूनच पंतप्रधानांनी बांबूला झाडांच्या वर्गवारीतून वगळले आणि गवत म्हणून मान्यता दिली. त्यामुळे लोक बांबू मोकळेपणाने लावू शकतात, वापरू शकतात आणि त्याचा व्यापार करू शकतात. बांबू लावा, बांबू वापरा, बांबूचे व्यापारीकरण करा. त्यातून अर्थव्यवस्था बळकट होईल आणि रोजगार निर्माण होईल. पर्यावरणाचे रक्षण होईल आणि पृथ्वी वाचेल. हीच बांबूची ताकद आहे,' असे ते म्हणाले.

हवामान बदलाला बांबू हा पर्याय!

'हवामान बदलाला तोंड देण्यात बांबूची भूमिका महत्त्वाची आहे. बांबू वेगाने पुन्हा उगवतो. त्यामुळे शाश्वत उत्पादन आणि उपभोगाला तो हातभार लावू शकतो. अधिक हरित आणि चक्राकार (सर्क्युलर) अर्थव्यवस्थेकडे जाण्यासही तो मदत करू शकतो. बांबूमुळे तरुण आणि महिला उद्योजक, बचत गट आणि ग्रामीण उद्योगांसाठी मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात, असे ते म्हणाले. बांबूकामात पारंगत असलेल्या भारतीय कारागिरांचे राज्यपालांनी कौतुक केले.

जैव इंधनाकडे वळा - पाशा पटेल

हवामान बदलाचा सामना करायचा असेल, तर जीवाश्म इंधने जाळणे थांबवावे लागेल आणि जैवइंधनाकडे वळावे लागेल, असे पाशा पटेल यांनी सांगितले. कोळसा, डिझेल आणि पेट्रोलला पर्याय शोधावाच लागेल. आजवर अन्नदाता असलेल्या शेतकऱ्याला आता ऊर्जादाता व्हावे लागेल. पृथ्वीच्या पोटातून ऊर्जा उपसण्याऐवजी पृष्ठभागावर ऊर्जा निर्माण करावी लागेल. तरच आपण वाचू आणि निसर्गाचा समतोल साधला जाईल. बांबूला पाणी व खते फार कमी लागतात. त्यामुळे शाश्वत शेतीसाठी तो आदर्श आहे, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in