
मुंबई : आपण अशा राज्यातून येतो जेथे दुसरी भाषा शिकण्यास विरोध केला जात आहे. मात्र देशात हिंदी भाषा येणे आवश्यक आहे, असे सांगून आपणाला स्वतःला हिंदी भाषा येत नाही याची खंत वाटते, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शनिवारी येथे सांगितले.
जगातील अनेक देश आज आपल्या कुशल कार्यबळाच्या पूर्ततेसाठी भारताकडे पाहत आहेत. मात्र अनेक देशांत नोकरीसाठी तेथील भाषा येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी युवा वयातच अधिकाधिक भाषा शिकाव्या. विविध देशांमधील रोजगाराच्या संधी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी हिंदीसह अधिकाधिक भाषा शिकाव्या. जर्मन, जपानी, इटालियन, फ्रेंच यांपैकी किमान एक भाषा शिकावी, असे आग्रही प्रतिपादन राज्य विद्यापीठांचे कुलपती असलेल्या सी. पी. राधाकृष्णन यांनी शनिवारी येथे केले.
राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा वर्धापन दिन सप्ताह विद्यापीठाच्या मुंबई येथील मुख्यालयात शनिवारी झाला, त्यावेळी ते बोलत होते.
हिंदी भाषा बोलता आली तर आपण गोर-गरीब जनतेच्या भावना अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकतो, असे सांगून जनसामान्यांच्या भावना जोवर समजून घेत नाही तोवर चांगला नेता होता येत नाही, असे राज्यपालांनी सांगितले. कौशल्य विद्यापीठाच्या युवा विद्यार्थ्यांना संबोधित करताना राज्यपाल म्हणाले की युवकांना जपानला जायचे असेल तर अगोदर जपानी भाषा शिकून घ्यावी, जर्मनीला जायचे असेल तर जर्मन भाषा शिकावी. त्यामुळे नोकरी- व्यवसाय करणे सुलभ होते, असे त्यांनी सांगितले.
जर्मनीमध्ये दंतवैद्यकाची अपॉइंटमेंट मिळण्याकरिता सहा सहा महिने थांबावे लागते. याकरिता आपल्या डॉक्टरांनी विदेशी भाषा शिकाव्या, असे सांगून आपण राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरूंना जर्मन, फ्रेंच, इटालियन आदी भाषा शिकण्यास वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे असे सांगितले असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. लहान वयात भाषा शिकल्यास ती मोठेपणी संपदा ठरेल, असे राज्यपालांनी सांगितले.