

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रवेश पासेसची विक्री करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी विधिमंडळ सचिवालयातील चार आणि मंत्रालयातील दोन अशा सहा कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. या प्रकरणातील एक खासगी व्यक्ती आहे.
नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र औद्योगिक महामंडाळाच्या नावाने बनावट लेटरहेडचा वापर करून प्रवेशिका मिळवण्यात आल्याचा गौप्यस्फोट खुद्द उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत केला होता. महामंडळाच्या बनावट लेटरहेडवर विभागातील अधिकाऱ्यांची नावे आणि पदे नमूद करून पासेस वाटण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले होते.
विधिमंडळ सचिवालयाच्या सुरक्षा विभागाकडून चौकशी केली असता, या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली होती. सचिवालय आणि मंत्रालयातील कर्मचारी यांनी संगनमत करून प्रवेश पास मिळवण्यासाठी औद्योगिक महामंडाळाच्या बनावट लेटरहेडचा वापर केल्याचे आढळून आले. यासंदर्भात ७ जणांवर मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये दत्तात्रय गुंजाळ या बाहेरच्या व्यक्तीचा समावेश आहे.
दरम्यान, सरकारी सेवा नियमानुसार ४८ तासांपेक्षा जास्त काळ पोलीस अटकेतील व्यक्तीला निलंबित केले जाते. त्यानुसार विधानभवनातील कर्मचारी मनोज मोरबाळे, महेश दुम्पलवार, स्वप्निल तायडे, लवेश नाकडे तर मंत्रालयातील गणपत जावळे, नागेश पाटील या सहा जणांवर आता प्रशानसनाकडून निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी गुरुवारी दिली.
विधानभवनाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या सुरक्षा त्रुटीची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले होते. मरिन ड्राईव्ह पोलिसांनी या प्रकरणी फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. या रॅकेटमध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे विधानभवनाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, भविष्यात डिजिटल क्यूआर कोड आधारित पासेस किंवा अधिक कडक सुरक्षा यंत्रणा राबवण्यावर विचार सुरू आहे.