
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत उभारलेल्या दोन पुनर्वसित इमारतींमधील ५५६ घरांचे चावी वाटप गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मांटुग्यात पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांना देण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे आणि आदित्य ठाकरे एका मंचावर येण्याची शक्यता आहे.
वरळी कोळीवाडा येथे नारळी पौर्णिमेच्या दिवशी एकाच वेळी आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक समोरासमोर आले होते. त्यावेळी काहीशा आक्रमक झालेल्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत धक्काबुक्कीही केली होती.
बीडीडी चाळ पुनर्विकास हा आदित्य ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. नियमितपणे प्रकल्पाची पाहणी करणे, प्रकल्पाचा आढावा घेणे, रहिवाशांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करणे, यासाठी आदित्य ठाकरे आग्रही होते. आता बीडीडी चाळीतील पहिल्या ५५६ घरांचा ताबा दिला जाणार आहे. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित राहणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आशियातील नागरी पुनरुत्थानाचा सर्वात मोठा बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प आता ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत वरळी बीडीडी चाळ प्रकल्पात पूर्ण झालेल्या दोन पुनर्वसन इमारतींतील ५५६ पात्र रहिवाशांना घरांचे वितरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. माटुंगा पश्चिम येथील यशवंत नाट्य मंदिर येथे गुरुवार १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याअंतर्गत उभारण्यात आलेल्या इमारत क्रमांक १ मधील डी व ई विंग मधील ५५६ पुनर्वसन घरांच्या वितरण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर उपस्थित राहणार आहेत.
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाद्वारे १२१ जुन्या चाळींतील ९ हजार ६८९ रहिवाशांचे पुनर्वसन होणार आहे. १६० चौरस फुटाच्या खोलीत राहणाऱ्या पात्र रहिवाशांना पुनर्वसन इमारतीत ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त २ बीएचके सदनिका मालकी तत्त्वावर विनामुल्य वितरित केली जाणार आहे. ४० मजल्यांच्या ३४ पुनर्वसन इमारती उभारण्यात येणार आहे.
डिसेंबरपर्यंत तीनही प्रकल्प पूर्णत्वास
येत्या डिसेंबरपर्यंत तीनही बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात ३ हजार ९८९ पुनर्वसन सदनिका पूर्णत्वास येणार आहेत. वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांचे तात्पुरत्या संक्रमण शिबिरात स्थलांतरण करण्यात आले आहे. चाळीतील रहिवाशांना भाडे किंवा संक्रमण गाळे यापैकी पर्याय निवडण्याचा विकल्प उपलब्ध करून देण्यात आला. निवासी व अनिवासी गाळेधारकास २५ हजार रुपये प्रति महिना ११ महिन्यांचे आगाऊ भाडे देण्यात येत आहे.