Mumbai : धनुष्यबाणावरून शिवसेना ठाकरे - शिंदे गटात राडा, मध्यरात्री कार्यकर्ते आपसात भिडले, नेमकं काय घडलं?

मुंबईतील प्रभादेवी येथे शिवसेनेच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते पुन्हा एकदा आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. फुटपाथवर लावलेल्या बोर्डवरील धनुष्यबाणाच्या चिन्हावरून हा वाद झाला.
Shivsena Shinde And Thackeray Group Clash
धनुष्यबाणावरून शिवसेना ठाकरे - शिंदे गटात राडाCanva
Published on

मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात अनेकदा विविध कारणांवरून वाद, भांडण पाहायला मिळतात. मंगळवारी मध्यरात्री मुंबईतील प्रभादेवी येथे शिवसेनेच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते पुन्हा एकदा आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. एबीपी माझाच्या वृत्तानुसार फुटपाथवर लावलेल्या बोर्डवरील धनुष्यबाणाच्या चिन्हावरून हा वाद झाला असून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बोर्डवरील चिन्ह काढल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

प्रभादेवीच्या आहुजा टॉवर येथील फुटपाथवर स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी स्वखर्चातून होर्डिंग बोर्ड बसवला होता. त्यावर वरच्या बाजूला धनुष्यबाणाचे चिन्ह होते. मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास फुटपाथवर लावलेल्या या बोर्डवर असणारं धनुष्यबाणाचं चिन्ह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कापून तेथून पळ काढला. यावेळी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना रंगेहात पकडलं असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणावरून ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली तसेच शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांनी धनुष्यबाण हे चिन्ह बोर्डावरून का काढलं असा जाब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना विचारला.

पक्ष चिन्हावरून वाद :

शिवसेनेत फूट पडल्यावर एकाच पक्षात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असा निर्णय दिल्याने त्यांना धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह मिळाले तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह देण्यात आले. मात्र दोन्ही गटात पक्ष चिन्हांवरून नेहमीच वाद पाहायला मिळतो.

Shivsena Shinde And Thackeray Group Clash
अधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी आहुजा टॅावर येथील फुटपाथवर लावलेल्या बोर्डवर सत्तांतरानंतर ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील होर्डिंग लावत होते. यावर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीही आक्षेप घेऊन, स्थानिक पोलिसांना पत्र व्यवहार करत ही बाब निदर्शनास आणून दिली असल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी रात्री दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये हा वाद झाल्यावर शिवसेनेचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर माहीम पोलीस ठाण्यात ठाकरे गटाचे पदाधिकारी शैलेश माळी, अमर लब्दे यांच्या सह अजून एकावर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.

logo
marathi.freepressjournal.in